.’नाशिक : वीजबिलांना अवधी किती, घरगुती जोडण्या किती बाकी, शेतीपंपांना जोडणी कधी देणार? कामे न करणाऱ्या ठेकेदाराला नोटीस दिली का? अशा एक नव्हे अनेक प्रश्नांचे मिळत असलेले नकारार्थी उत्तरे व अधिकाऱ्यांची वारंवार उडणारी भंबेरी पाहून अखेर राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी ‘जे काही चाललंय ते बरं नाय’ अशी उद्विग्न होऊन प्रतिक्रिया व्यक्त केली. येत्या पंधरा दिवसांत अधिकाऱ्यांच्या वर्तुणुकीत योग्य तो बदल न झाल्यास अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंते व कनिष्ठ अभियंत्यांची थेट गडचिरोली येथेच बदली करण्याचा इशाराही त्यांनी दिला.नाशिक जिल्ह्यात वीज वितरण कंपनीच्या कामांचा आढावा ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी घेतला. सुमारे पाच तास चाललेल्या या आढाव्यात वीज कंपनीच्या भोंगळ व मनमानी कारभाराचे वारंवार प्रदर्शन घडून बावनकुळे यांना वेळोवेळी डोक्याला हात लावून घेण्याची वेळ आली, त्यातूनच चिडलेल्या ऊर्जामंत्र्यांनी अखेर बैठकीतूनच वीज कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांना भ्रमणध्वनीवरून आपली नाराजी तर कळविलीच, पण येत्या पंधरा दिवसांत नाशिक विभागाची परिस्थिती सुधारली नाही, तर कोणालाच माफ करणार नाही अशी तंबीही दिली. या बैठकीत वीज कंपनीच्या वतीने सुरू असलेल्या विविध कामांचे सादरीकरण करण्यात आले. त्यात नाशिक जिल्ह्यात ‘इन्फ्रा-एक’ अंतर्गत ९२६ कोटींचे, तर ‘इन्फ्रा-दोन’ अंतर्गत ४१८ कोटींचे कामे सुरू असल्याचे सांगण्यात आले. (पान ७ वर)ठेकेदारांमार्फत कामे केली जात असली तरी, काही दिवसांतच रोहित्रे जळण्याचे प्रकार घडू लागल्याची व रोहित्र बदलण्यासाठी शेतकऱ्यांकडून पैसे वसूल केले जात असल्याची तक्रार आमदार अनिल कदम, जयंत जाधव यांनी केली. शेतकऱ्यांनी पैसे दिल्यावरही एक ते दीड महिना रोहित्र बदलले जात नाही असे जिवा पांडू गावित यांनी सांगितले. त्यावर बावनकुळे यांनी ठेकेदाराकडून कामे पूर्ण झाल्याचा दाखला घेतल्यानंतर त्याचबरोबर दक्षता पथकाकडूनही त्याची यापुढे खात्री करून घेण्यात येणार असल्याचे सांगितले. ज्या ठेकेदाराने कामे केली त्याच्यावरच त्याच्या दोन वर्षे देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी टाकण्यात याव्यात अशा सूचना केल्या. ग्रामीण भागात विजेची मागणी वाढल्याने २५ के.व्ही.चे रोहित्रे चालत नाहीत, त्यामुळे ते बदलून अधिक क्षमतेचे बसविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. त्यावर यापुढे नवीन ठिकाणी १०० के.व्ही.चे रोहित्रे बसविण्याचा निर्णय वीज कंपनीने घेतल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बहुतांशी गावांमध्ये अद्यापही सिंगल फेज वीजपुरवठा केला जात नसल्याने गावेच्या गावे अंधारात राहत असल्याकडे लोकप्रतिनिधींनी ऊर्जामंत्र्यांचे लक्ष वेधले, त्यावर वीज कंपनीकडे अशा गावांची माहिती मागितली असता, ती देण्यास ते असमर्थ ठरले. ऊर्जामंत्र्यांनी प्रत्येक गाव निहाय माहिती सादर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या, परंतु त्यांच्याकडे माहितीच नसल्याने अधिकाऱ्यांना खडसावले. ‘उर्जामंत्री बैठक घेणार असल्याचे माहित असूनही परिपूर्ण माहिती न देण्याचे कारण काय’ असा सवाल त्यांनी विचारला व ज्या गावांमध्ये सिंगल फेज आहे त्या गावांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करणार असल्याचे सांगितल्यावर अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. कार्यकारी अभियंता व अधीक्षक अभियंत्यांनी सादर केलेल्या माहितीत तफावत आढळून आल्याने संतप्त झालेल्या ऊर्जामंत्र्यांनी चुकीची माहिती देणाऱ्यांच्या सेवापुस्तकात नोंद घेण्याचा इशारा दिला. या बैठकीस खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, जयंत जाधव, अनिल कदम, नरहरी झिरवाळ, राजाभाऊ वाजे, योगेश घोलप, डॉ. राहुल अहेर यांच्यासह वीज कंपनीचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उद्विग्न ऊर्जामंत्री : अधिकाऱ्यांना सुधारण्यासाठी पंधरा दिवसांचा अवधी
By admin | Published: January 30, 2015 12:44 AM