नाशिक : आदिवासी विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळावा व प्रकल्प अधिकारी आशीर्वाद यांची बदली करावी यांसह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने सोमवारी आदिवासी विकास आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी आयुक्तालयाच्या कारभाराविरोधात घोषणाबाजी केली. अनेक आदिवासी विद्यार्थ्यांना अद्यापही वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसल्यामुळे ते शिक्षणापासून वंचित असून, अशा सर्व विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश देण्यात यावा, दीडशे मुले व शंभर मुलींचे वाढीव वसतिगृह बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा, नाशिक प्रकल्प कार्यालयात अभ्यासू अधिकाऱ्याची नेमणूक करावी, प्रकल्प अधिकारी आशीर्वाद यांची बदली करावी, वसतिगृहातील विद्यार्थ्यांना भोजनासाठी सुरू करण्यात आलेली डीबीटी पद्धत बंद करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या असून, डीबीटी पद्धत बंद न झाल्यास १९ नोव्हेंबरपासून बेमुदत आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. या आंदोलनात लकी जाधव, गणेश गवळी यांच्यासह मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी सहभागी झाले होते.
विविध मागण्यांसाठी आदिवासी विकास परिषदेचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 12:02 AM