नाशिक : नाशिक रोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयासह अनेक विभाग पातळीवरील कार्यालये या मार्गावर आहेत. प्रेसचा रस्ताही येथूनच जातो. मात्र, या रस्त्याच्या दुरूस्तीला अद्यापही मुहूर्त मिळू शकलेला नाही. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुर्दशा झाली आहे.
गंगापूर रस्त्यावर पार्किंगची समस्या
नाशिक : गंगापूर नाका ते विद्याविकास सर्कल दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभ्या राहणाऱ्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांमुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. या मार्गावर अनेक खाद्यपदार्थांची दुकाने असल्याने याठिकाणी थांबणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यावेळी रस्त्यावरच वाहने उभी केली जात असल्याने अन्य वाहनचालकांना अडथळा निर्माण होत आहे.
शहरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ
नाशिक : शहरात दुचाकी चोरी तसेच घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. घरासमोर तसेच इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या दुचाकी चोरटे लंपास करत आहेत. काही घटनांमध्ये खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांच्या दुचाकीही चोरीला गेल्या आहेत. या चोरीच्या घटनांना आळा घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
मांजाऐवजी फक्त पतंग विक्री
नाशिक : शहर पोलिसांनी नायलॉन मांजाविरेाधात मोहीम उघडली असून, या मोहिमेचा धसका विक्रेत्यांनी घेतला आहे. अनेक विक्रेत्यांनी केवळ पतंग विक्री सुरू केली असून, मांजा इतर ठिकाणाहून घेण्याचा सल्ला ग्राहकांना दिला जात आहे. मांजा विक्रीसाठी आल्यानंतर पोलिसांकडून तपासणी होत असल्याने पोलीस कारवाई टाळण्यासाठी विक्रेते मांजाची विक्री करत नसल्याचे दिसून येत आहे.