मालेगाव : कविता मुक्याचे शब्द, आंधळ्याची दृष्टी व माणुसकीची सृष्टी दाखवते. कळांची असह्य वेदना कवितेतून विरोधाचा हुंकार फोडते, असे प्रतिपादन सदाशिव सूर्यवंशी यांनी केले.मालेगाव मराठी साहित्य संघातर्फे आयोजित जिल्हास्तरीय कविसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. सूर्यवंशी पुढे म्हणाले, तापलेल्या मातीच्या ढेकळावर पाण्याचा थेंब पडून सुगंध दरवळतो तसा सुगंध मालेगाव मराठी साहित्य संघाच्या माध्यमातून दरवळत राहिला आहे. सादर केलेल्या कवितांतून नात्यांची सुंदर गुंफण, मायेचा ओलावा, समाज मनाची उत्तम मांडणी पाहायला मिळाली.मालेगाव मराठी साहित्य संघाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मराठा दरबारमध्ये आयोजित कविसंमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कविसंमेलनात प्रारंभी साहित्य संघाच्या ५० वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेण्यात आला. यावेळी मंचावर साहित्य संघाचे अध्यक्ष रमेश उचित, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष राजेंद्र भोसले उपस्थित होते. प्रास्ताविक उचित यांनी केले. त्यांनी ५० वर्षांचा मागोवा घेतला. राजेंद्र भोसले यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी बालकवितेसाठी समृद्धी खैरनारला ‘आई प्रेमाचा सागर’ या कवितेसाठी प्रथम पुरस्कार मिळाला. तृप्ती श्रावणला ‘आई’ या कवितेसाठी द्वितीय, श्रुती भोईरला ‘छंदवेडी’साठी तृतीय पुरस्कार मिळाला. ज्येष्ठ गटात ‘बाई’ या कवितेसाठी सत्यजित पाटील यांना पहिला पुरस्कार मिळाला. मधुरा जोशीला ‘कविता : एक प्रवास’ यासाठी दुसरा व प्रा. अरविंद भामरे यांना ‘एकदा तरी संपावर ने’ यासाठी तिसरा पुरस्कार मिळाला. समाधान शिंपी यास ‘संघर्षातून समृद्धी’कडे यासाठी व राजेंद्र सोमवंशी यांना ‘माय सावित्री’ या कवितेसाठी उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. परीक्षण डॉ. विनोद गोरवाडकर, सुरेंद्र टिपरे व संतोष कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन सोनार यांनी केले. जगदीश वैष्णव यांनी आभार मानले. संघाचे कार्याध्यक्ष सतीश कलंत्री, नाना महाजन, डॉ. एस. के. पाटील, विलास सोनार, शिवाजी साळुंखे, टी. अहिरे, प्रा. भारती कापडणीस, भास्कर तिवारी, संजय पांडे, वैदेही भगीरथ, नितीन शेवाळे, अभयराज कांकरिया, विजय पोफळे, डॉ. सुरेश शास्त्री, अशोक फराट, प्रा. बी. एम. डोळे, सुरेश गरुड, श्यामकांत पाटील यांच्यासह साहित्यिक यावेळी उपस्थित होते.