नाशिक : जीवघेण्या कोविड संकटात माता-पिता अथवा दोहोंपैकी एकास गमावलेल्या बालकांना मदतीचा हात देत समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शहरातील सामाजिक संस्थांनी एकत्र येत त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यापासून ते त्यांना स्वावलंबी करण्याचा विडा उचलत त्यांच्यात नवचेतना जगवण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हाभरातील ८० मुलांचे पालकत्व स्वीकारत ‘दिव्य चेतना सोशल फाउंडेशन’तर्फे नाशिकमध्ये रविवारी (दि.२७) ‘नवचेतना संकल्प’ उपक्रमाचा शुभारंभ केला. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात १५ मुलांना आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी खा. हेमंत गोडसे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी आदी उपस्थित होते.
कोरोना संकटात अनेक बालकांनी माता-पिता तर काहींनी दोघांपैकी एकाचा आधार गमावला आहे. ही बाब लक्षात घेत दिव्य चेतना सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून या बालकांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी उचलतानाच त्यांना कौशल्यनिपुण करण्याचा उद्देश आहे. या उपक्रमात भारतीय जैन फाउंडेशन, गुंज फाउंडेशन, तनिष्का, राऊंड टेबल-१०७ आणि लेडीज सर्कल-११९ या सामाजिक संस्थांचेही योगदान असणार आहे. पालक गमावलेल्या मुलांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांना आर्थिक साहाय्य दिले जाणार असून यात प्रामुख्याने शाळेची फी, स्टेशनरी, युनिफॉर्म यांचा समावेश आहे. या उपक्रमातून निराधार विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर ब्राह्मणकर, कांता राठी, प्राचार्य प्रशांत पाटील, राजेश कोठावदे, घनश्याम येवला, जया पटेल, विजय बाविस्कर, अरविंद महापात्रा, हेमंत राठी, गौरव ठक्कर यांच्या नेतृत्वाखाली विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.