नाशिक: जन्मत:च दोन्ही हात आणि पायांची वाढ कमी झाल्याने शाळेपासून सुरू झालेला शिक्षणाचा संघर्ष आजही संपलेला नाही. दिव्यांगत्व असल्याने समाजाकडून काही मिळेल या अपेक्षेत राहण्यापेक्षा आपणच आपल्या पायावर उभे राहावे म्हणून संगणक कौशल्यापर्यंत मजल मारलेल्या अतुल तांबे याने संगणक शिक्षणात उंची गाठली आणि ग्रामरोजगार सेवक म्हणून तो कामही करू लागला आहे.
अतुल तांबे याचा जन्म करंजगव्हाण, ता. निफाड येथील. आईवडील अशिक्षित असले तरी त्यांनी मुलाला शिकविण्याची धडपड सुरू केली. चाणाक्ष बुद्धिमत्ता असल्याने त्यानेही शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यास पुणे जिल्ह्यातील अपंग कल्याण केंद्र, आणे येथील शाळेत टाकण्यात आले, अतुलची जीवन जगण्यासाठीची धडपड व शाळेत हुशार विद्यार्थी असल्याने त्याने अनेक मित्र बनविले. कोणतीही गोष्ट जाणून घेण्याची आणि ती करून पाहण्याची त्याची जिद्द त्याला संगणक कौशल्यापर्यंत घेऊन आली.
पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांने गावी येऊन पुढे शिक्षण सुरू ठेवले. संगणक कौशल्य असल्याने त्याला गावातील ग्रामपंचायत येथे ग्रामरोजगार सेवक म्हणून तात्पुरती का होईना; पण नोकरी लागली. दिव्यांगांनी आलेल्या परिस्थितीशी व संकटाशी न डगमगता इच्छाशक्ती, आत्मविश्वास व त्यास प्रामाणिकपणा हे त्रिसूत्र अवलंबविल्यास यश निश्चितपणे प्राप्त करता येते, असे अतुल सांगतो. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर सहकारी दिव्यांग मित्रांसमवेत शिवनेरी किल्लादेखील चढला आहे. कायमस्वरूपी रोजगार नसल्याची खंत मात्र त्याला आहे.
--इन्फो--
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे नाशिक दौऱ्यावर आले असता अतुल तांबे यांना राष्ट्रपतींना भेटण्याचा योग आला. कलाम यांनी त्याचे कौतुक करून त्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
(फाटो:०२:अतुल तांबे)