नाशिक : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने फटाके विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेल्या गाळ्यांच्या लिलावातून तब्बल ५४ लाख ७७ हजार रुपयांची कमाई केली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत महापालिकेने २१ लाख रुपये जादा प्राप्त केले आहेत. महापालिकेमार्फत शहरात ३८९ गाळ्यांचे लिलाव काढण्यात आले होते. त्यापैकी १९३ गाळ्यांना प्रतिसाद मिळालेला आहे. महापालिकेच्या वतीने दरवर्षी सहाही विभागात फटाके विक्रीसाठी खुल्या जागा उपलब्ध करून दिल्या जातात. यंदा महापालिकेने चारशेहून अधिक जागांचे प्रस्ताव मान्यतेसाठी पोलीस विभागाला पाठविले होते. त्यापैकी ३८९ गाळ्यांना पोलिसांनी परवानगी दिली होती. सदर गाळ्यांसाठी महापालिकेने लिलावप्रक्रिया राबविली. लिलावाच्या वेळी महापालिकेच्या १९३ जागांनाच बोली बोलली गेली, तर १९६ गाळ्यांना बोली न आल्याने लिलावप्रक्रिया तहकूब ठेवण्यात आली. या जाहीर लिलावाद्वारे महापालिकेला जागा लायसेन्स फीच्या माध्यमातून ३५ लाख ३९ हजार, अग्निशमन दाखला फी म्हणून ७ लाख ७२ हजार, फटाका विक्री लायसेन्स फीद्वारे ९,६५० रुपये प्राप्त झाले आहेत. यावर्षी शासनाने राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयानुसार फटाके विक्रेत्यांकडून प्रत्येकी तीन हजार रुपये स्वच्छ पर्यावरण फी वसूल करण्याचे आदेशित केले होते. त्यानुसार, स्वच्छ पर्यावरण शुक्ल अंतर्गत ५ लाख ७९ हजार रुपये प्राप्त झाले आहेत, तर १५ टक्के केंद्र शासनाचा सेवा कर म्हणून ५ लाख ३६ हजार रुपये जमा झाले आहेत. यंदा फटाके गाळ्यांच्या विक्रीतून महापालिकेच्या खजिन्यात ५४ लाख ७७ हजार रुपये जमा झाले आहेत. मागील वर्षी महापालिकेने २८९ गाळ्यांसाठी लिलावप्रक्रिया राबविली होती. त्यापैकी प्रत्यक्षात १७२ गाळ्यांचा लिलाव झाला होता तर ११७ गाळे प्रतिसाद न मिळाल्याने शिल्लक होते. मागील वर्षी महापालिकेला गाळेविक्रीतून ३३ लाख ७ हजार रुपयांची कमाई झाली होती. मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल २१ लाख ६९ रुपयांची वाढ गाळेविक्रीतून झाली आहे. नुसत्या लायसेन्स फीमध्ये ६ लाख ४३ रुपयांची वाढ झाली असल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी दिली. (प्रतिनिधी)
फटाके गाळेविक्रीतून दिवाळी
By admin | Published: October 28, 2016 12:20 AM