नाशिक : कमी झालेल्या सुट्या, वेळेचाअभाव, घरगुती टच असलेल्या पदार्थांना मिळत असलेली पसंती या अशा अनेक कारणांमुळे हल्ली दिवाळीला घरी फराळ बनविण्यापेक्षा बाहेरून रेडिमेड फराळ विकत घेण्यावर भर दिला जात आहे. हा ट्रेंड लक्षात घेऊन नाशिकमध्ये २०० ते ३०० बचतगटांनी शहराच्या निरनिराळ्या भागात प्रदर्शने भरवून किंवा आपापल्या ठिकाणी काम करीत आॅर्डर घेऊन दिवाळीच्या फराळाचे पदार्थ व दिवाळीच्या वस्तू तयार करून त्यांची मोठ्या प्रमाणात विक्री केली आहे. यातून जवळपास २५ लाखांची उलाढाल झाली असून, यात प्रत्यक्षात विक्री, आॅस्ट्रेलिया, अमेरिका, सिंगापूर अशा देशांमध्ये पाठविलेले पदार्थ, कार्पोरेट आॅर्डर्स आदिंचा समावेश आहे. घरगुती पद्धतीने मात्र चव, दर्जा यांच्याशी तडजोड न करता चवदार फराळाचे पदार्थ बनवून ते ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिल्याने त्यांना ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद लाभला आहे. फराळांच्या पदार्थांबरोबरच बचतगटांनी पणत्या, आकाशकंदील, उटणे आदि विविध वस्तूही तयार करून विकल्या असून, त्यांनाही ग्राहकांनी भरभरून प्रतिसाद दिला. बचतगटांना यंदा नाशिकमधील विविध कंपन्यांनी आॅर्डर्स दिल्या होत्या. मागणीप्रमाणे ८० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंत फराळाच्या पदार्थांचे पॅकिंग करून कंपन्यांना दिल्यानंतर फिनिशिंग, पॅकिंगचे परडी, बॉक्स, सोनेरी-चंदेरी रॅपिंग पाहून कंपन्यांनी बचतगटांच्या महिलांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे. नगरसेवक अश्विनी बोरस्ते यांनी बचतगटांच्या महिलांना एकत्र करून दिवाळीच्या फराळांचे व वस्तूंचे प्रदर्शन भरवून बचतगटांना बुस्ट देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे नारायणबापूनगर येथील वंदना चाळीसगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरूअसलेल्या वंदन बचतगटानेही मोठ्या प्रमाणात फराळाचे पदार्थ तयार केले आहेत.
बचतगटांद्वारे दिवाळी फराळ, वस्तूंची लाखोंची उलाढाल
By admin | Published: October 31, 2016 1:41 AM