नाशिक : तुरदाळीपासून शेंगदाण्यापर्यंत अशा सर्वच किराणा मालाच्या दरवाढीचा आलेख अद्याप चढता असल्याने नागरिकांमध्ये कमालीची नाराजी आहे. दसरा व नवरात्रोत्सवानंतरही शहरातील किराणाच्या बाजारपेठेमध्ये शुकशुकाट जाणवत आहे. एकूणच दरवाढीचा धसका नागरिकांनी घेतल्याने बाजारात मंदीचे सावट पसरले असून, दोन आठवड्यांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीच्या फराळाला महागाईचे ग्रहण लागले आहे.येत्या ७ नोव्हेंबरला गोवत्स द्वादशीपासून दिवाळीची लगबग सुरू होणार आहे. वसूबारस पूजनाने दिवाळीस सुरुवात होणार असल्याने नागरिकांकडून सणाची तयारी सुरू झाली आहे. महिलावर्गाची लगबग हळूहळू दिसू लागली असल्याने फराळाचे नियोजन करण्यामध्ये गृहिणी व्यस्त झाल्या आहेत; कारण यावर्षीची दिवाळीवर महागाईचे मोठे ग्रहण आहे. नवरात्रोत्सवाच्या प्रारंभीच तूरदाळीच्या दरवाढीचा भडका उडाला अन् सर्वच डाळींपासून ते थेट शेंगदाण्यापर्यंत किराणा महागला. तुरदाळ प्रतिकिलो १९० रुपयांवर जाऊन पोहचली होती. अवघ्या तीन दिवसांपासून २० ते २५ रुपयाने तुरदाळीच्या दरात घट झाल्याने १६० रुपयांपर्यंत तूरदाळ प्रतिकि लो दराने विक्र ी होत आहे; मात्र दिवाळीच्या आठवडाभरापूर्वी बाजाराचे चित्र सध्याच्या तुलनेत अधिक वेगळे होऊ शकते, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. किराणा बाजारात बेसन, रवा, मैदा, दाळ्या, शेंगदाणे, उडीदडाळ, मूगडाळ, मसूरदाळीच्या दरातदेखील फारसा फरक अद्याप पडलेला नाही. दीपावलीचा सण हा दोन आठवड्यांवर आला असतानाही शहरातील रविवार पेठ भागातील किराणा बाजारात निरव शांतता दिसून येत आहे. बाजारामधील खरेदी-विक्रीचे व्यवहार सध्या ठप्प असून, संपूर्ण बाजार वाढत्या महागाईमुळे मंदीकडे झुकला आहे.
दिवाळीच्या फराळाला महागाईचे ग्रहण
By admin | Published: October 25, 2015 10:45 PM