नाशिक (सुयोग जोशी): गांजुनिया भारी दुःख दारिद्र्याने...पाऊले चालती पंढरीची वाट...सुखी संसाराची तोडुनिया गाठ, मन लागो रे माझे गुरूच्या चरणी यासह विविध भक्तीगीतांच्या स्वररसात रसिक चिम्ब न्हाहले.
निमित्त होते स्वामी विवेकानंदनगरमध्ये पाडवा पहाट कार्यक्रमाचे. वामनराव सोनवणे प्रतिष्ठानतर्फे दिवाळी-पाडवा पहाटचे आयाेजन करण्यात आले होते. यावेळी महेश धोडपकर, मीनल धोडपकर यांच्या मेघ मल्हार भावगीत व भक्तिगीतांच्या मैफिलिने पहाटेच श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. एकापेक्षा एक सरस गीतांनी पाडव्याची पहाट संसमरणीय ठरली.
राधा ही बावरी...हरिची.., अंजिनीच्या सुता तुला रामाचे वरदान, बोला एकमुखाने बोला जय जय हनुमान, गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये; यळकोट यळकोट जय मल्हार, नवीन हे वर्ष सुखाचे जाओ, बाजाराला विकण्या निघाली दही दूध ताक आणि लोणी, बाई माझ्या ग दुधात नाही पाणी यासारखी गीते श्रोत्यांच्या मनात घर करून गेली. कार्यक्रमात महेश धोडपकर (तबला), किरण गायधनी (ध्वनी), ओम गायकवाड (सिंथेसायझर), ओम गायकवाड यांनी साथसंगत केली. निवेदन गणेश कड यांनी केले. यावेळी उपस्थित महिला व पुरुषांसाठी लकी ड्रॉचे आयोजन करत मान्यवरांच्या हस्ते विविध बक्षिसांचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी सभापती सुमन सोनवणे, राहुल सोनवणे, सतीश सोनवणे, बाळासाहेब सांगळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.