नाशिक : अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची गर्दी वाढत असून, रविवार सुटीच्या दिवशी शहरातील मुख्य बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने फुल्ल झाल्या आहेत. रविवार असल्याने सुटीची संधी साधत नाशिककरांनी खरेदीचा आनंद लुटला. शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या मेनरोडवर प्रचंड गर्दी झाल्याने या मार्गावर चारचाकी वाहनांना मनाई करण्यात आली होती. जुने आयुक्तालयासमोरील तिबेटियन मार्केटमध्ये तयार कपड्याच्या बाजारात तरुणांची मोठी गर्दी झालेली दिसते. या ठिकाणी महाविद्यालयीन तरुणांसाठी लागणारे फॅशनेबल तयार कपडे उपलब्ध असल्याने या ठिकाणी खरेदीला वेग आला आहे. शिवाय तिबेटियन मार्केटमध्ये हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर तरुणांना आकर्षित करणारे फॅशनेबल कपडे खरेदीकडेही कल असल्याचे दिसून आले. शहरातील कॉलेजरोड, गंगापूररोड शालिमार, महात्मा गांधीरोड, रविवार कारंजा, पंचवटी या ठिकाणीदेखील ग्राहकांची गर्दी वाढण्यास प्रारंभ झाला आहे. नाशिकरोडच्या आजूबाजूला खेडेगावाचा परिसर असल्याने गाव खेड्यातील ग्राहकांनी नाशिकरोडची बाजारपेठ बहरली आहे. नाशिकरोडच्या बाजारपेठत मागील आठवड्यापासूनच गर्दी झाल्याचे चित्र आहे. रविवारी तर मोठ्या प्रमारात गर्दी झाली होती. देवळाली कॅम्प येथील लेव्हट मार्केटमध्येदेखील ग्राहकांची गर्दी झाली आहे. दिवाळी खरेदीसाठी देवळालीकॅम्प, भगूर, लहवित या गावांबरोबरच आजूबाजूच्या खेड्यापाड्यातून मोठ्या प्रमाणात ग्राहक कॅम्पमध्येच खरेदी करतात. त्यामुळे येथेही गर्दी झाल्याने बाजारपेठ बहरली आहे.दिवाळी तोंडावर आल्याने खरेदीची लगबग वाढल्याचे चित्र असून, बाजारपेठेत रेलचेल वाढल्याचे दिसून येते. मेनरोड येथे सर्वप्रकारच्या वस्तूंचे मार्केट असल्यामुळे सर्वाधिक गर्दी याच ठिकाणी होते. शनिवार व रविवारची सुटी असल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून बाजारात ग्राहकांची गर्दी होत आहे.
रविवारमुळे दिवाळी खरेदीची झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 1:40 AM