गंगापूर धरण बॅकवॉटरचा परिसर नाशिककरांचे वीकेंण्ड वन-डे पर्यटनाचे हक्काचे पसंतीचे ठिकाण राहिले आहे. गंगापुर, सावरगाव, गंगावऱ्हे, गोवर्धन, महादेवपुर, गिरणारे, नागलवाडी, ओझरखेड, पिंपळगाव-गरुडेश्वर, गणेशगाव या भागात मोठ्या संख्येने फार्महाऊस, रिसॉर्टची उभारणी करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून या परिसराला रात्रीच्यावेळी ‘पार्टी कल्चर’चा रंग चढू लागल्याने स्थानिक गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. दिवसभर काबाडकष्ट केल्यानंतर रात्रीची झोप शेतमजुरांना घेणे अवघड बनत चालल्याच्या तक्रारी स्थानिकंकडून होत आहे. डीजे साऊंड सिस्टीमचा दणदणाट, फटाक्यांचा येणारा आवाजाने रात्रीची शांतताही भंग होत आहे. हा सर्व भाग नाशिक तालुका पोलीसांच्या हद्दीत समाविष्ट आहे. दुगाव, गिरणारे येथे तालुका पोलीस ठाणे अंकित पोलीस चौक्यांची उभारणीही करण्यात आली आहे; मात्र या चौक्यांमध्ये पुरेशे मनुष्यबळ उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे.
---इन्फो--
सोशल मीडियावर आंदोलनाची हाक
फेसबुक, व्हॉटसॲप यासारख्या समाजमाध्यमांमधून हायप्रोफाईल धनदांडग्यांच्या ‘पार्टीकल्चर’विरुध्द स्थानिक शेतकरी, शेतमजुरांकडून आंदोलनाची हाक दिली जात आहे. सोशलमिडियावर ग्रामीण पोलीसांच्या भूमिकेविषयीसुध्दा तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. येथील काबाडकष्टकऱ्यांचे मदिरेच्या नशेत झिंगणाऱ्या शहरी धनदांडग्यांना काहीही देणेघेणे नसल्याची टीका होऊ लागली आहे. एकुणच शहरी उच्चभ्रुविरुध्द स्थानिक संघर्ष निर्माण होण्यापुर्वीच पोलिसांनी हस्तक्षेप करत गंगापुर धरणाच्या काठावरील गावांच्या शिवारातील रात्रीचे ‘पार्टी कल्चर’ थांबविण्याची मागणी जोर धरु लागली आहे.
---इन्फो--
पर्यावरणप्रेमी संस्थांकडूनही एल्गार
नाशिक शहरातील विविध पर्यावरणप्रेमी संस्था, संघटनांकडूनही मद्यपींचा धिंगाणा आणि धरणाच्या काठांवरील त्यांच्याकडून होणारे प्रदूषणाविषयी तीव्र संताप व्यक्त होऊ लागला आहे. यामुळे पर्यावरणप्रेमींनी या पाणथळ जागेच्या संवर्धनाठी सोशलमिडियाद्वारे एल्गार पुकारला आहे. विविध पक्षीप्रेमी, वन्यजीवप्रेमी, निसर्गप्रेमींसह शांतताप्रिय नागरिकांकडून पाठिंबा मिळताना दिसत आहे.
---इन्फो--
सर्रास उडविला जातोय हुक्क्याचा धूर
या भागात रात्रीच्यावेळी चंगळवादासाठी येणाऱ्या शहरी भागातील हायप्रोफाईल मंडळींकडून सर्रासपणे हुक्का बार चालवित वातावरणातू धूर सोडला जात आहे. धरण पर्यटनाच्या नावाखाली चालणारा हा धिंगाणा केवळ चंगळवादी, भोगवादी संस्कृतीला वाव देणारा ठरत असल्याची टीका सोशल मीडियातून होऊ लागली आहे.