जळगाव निंबायती: येथील भिलाजी दुकळे कुटुंबांचा शेती हा पारंपरिक मूळ व्यवसाय.मात्र, हवामानाला अनुकूल व बाजारपेठेतील मागणी यांचा विचार करून शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून आधुनिक पद्धतीने बंदिस्त शेळीपालन या व्यवसायाची सुरुवात झाली. आज आफ्रिकन बोअर प्रजातींच्या शेळीपालनातून वर्षाला चांगले उत्पन्न मिळविण्यात त्यांची सूनबाई ज्ञानेश्वरी दुकळे ही गृहिणी यशस्वी झाली. शिवाय, परंपरागत शेतीव्यवसायाला शेळीपालनाच्या जोडधंद्यातून चांगले आर्थिक पाठबळ मिळाले.
अवघ्या दोन शेळ्या व एक बोकडापासून व्यवसायाला सुरुवात केली होती, आज लहान-मोठ्या तब्बल ४७ शेळ्या आहेत. साधारणतः वर्षांला किमान अडीच ते तीन लाख रुपयांपर्यंत हमखास उत्पन्न मिळते. त्याचबरोबर शेळ्यांपासून वर्षाला सुमारे आठ ते दहा ट्रॉली लेंडीखत मिळते. यातून चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपयांची मिळकत होते. सुरुवातीला शेतातील घरासमोरील चार गुंठे क्षेत्रावर ३० बाय ४० फूट आकाराचे बंदिस्त शेळीपालनासाठी शेड उभारले. यामध्ये चार कप्पे केले. करडांसाठी स्वतंत्र कप्पे केले. शेडच्या कडेला जाळीचे कुंपण व वर छतावर पत्रे अशी व्यवस्था केली.
शेळीपालन व्यवसायासाठी गावठी शेळ्यांबरोच आफ्रिकन बोअर प्रजातींच्या शेळ्याची निवड केली. कारण, या बोकडांना बाजारात अधिक मागणी असते. अपेक्षित दरदेखील मिळतो. शिवाय, ही प्रजाती काटक असते.या प्रजातीत रोगाचा प्रादुर्भाव होण्याचे प्रमाणदेखील कमी असते. तसेच या प्रजातीचे बोकडांचे वजन साधारणतः ७० ते ८० किलोपर्यंत असते. सकाळपासून शेळ्यांच्या व्यवस्थापनास सुरुवात होते. शेळ्यांच्या पिल्ल्ांना दूध पाजण्यासाठी सोडले जाते. त्यानंतर जादा झालेले दूध काढून घरच्यांसाठी वापरले जाते. शेडची स्वच्छता करून सकाळी दहा वाजता आणि सायंकाळी पाच वाजता शेळ्यांना चाराकुट्टी आणि खाद्यमिश्रण दिले जाते. गरजेनुसार शेळ्यांना पाणी मिळेल याची व्यवस्था केली आहे. ज्ञानेश्वरी दुकळे यांना त्यांचे पती योगेश्वर दुकळे यांनी आर्थिक बळ व वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाने मोठी साथ मिळाली. भविष्यात आफ्रिकन बोअर जातीचा संकर करुन ५० ते ६० पैदासयोग्य शेळ्या वाढविण्याचा मनोदय यावेळेस दुकळे हिने व्यक्त केला.
इन्फो..
लसीकरणावर भर
शेळ्यांचे आरोग्य चांगले रहावे, यासाठी वेळापत्रक आणि पशुतज्ज्ञांच्या शिफारशीनुसार लसीकरण केले जाते. प्रामुख्याने सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये लाळ्या खुरकूत, डिसेंबरमध्ये पीपीआर (तीन वर्षातून एकदा), मार्च-एप्रिल-मे महिन्यात २१ दिवसांच्या अंतराने लाळ्या खुरकूत, घटसर्प आणि आंत्रविषाराची लस दिली जाते. नवजात करडांना २१ दिवसांनी आंत्रविषाद व १५ दिवसांनी बुस्टरचा डोस दिला जातो. याशिवाय गरजेनुसार जंतनाशकाची मात्रा शेळ्यांना पाजली जाते. वेळेवर लसीकरण आणि औषधोपचारामुळे शेळ्यांचे आरोग्य चांगले राहिले आहे. त्यांच्या वजनामध्येही चांगली वाढ होते.
कोट...
लग्नानंतर उच्च शिक्षण घेणे शक्य झाले नाही. मात्र, घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग करुन शेतीला पूरक म्हणून आधुनिक पध्दतीने बंदिस्त शेळीपालन व्यवसायाची निवड केली. त्यातून चांगले यश मिळाले. सुयोग्य व आधुनिक शास्त्रीय व्यवस्थापन पध्दतीने बंदिस्त शेळी पालनाचा व्यवसाय केल्यास हमखास उत्पन्नाची हमी मिळते. शिवाय त्यापासून रोजगाराची निर्मिती होऊ शकते. ज्याप्रमाणे पोल्ट्री व्यवसायामध्ये ठरावीक कालावधीत कोंबड्यांना दिल्या जाणाऱ्या खाद्य व पाण्यामुळे त्यांचे वजन वाढते, त्याचप्रमाणे आधुनिक बंदिस्त शेळीपालनात शेळ्यांचे संगोपन होणे आवश्यक आहे.
- ज्ञानेश्वरी दुकळे, शेळीपालन व्यवसायिक, जळगाव निंबायती
===Photopath===
180421\18nsk_10_18042021_13.jpg~180421\18nsk_11_18042021_13.jpg
===Caption===
ज्ञानेश्वरी दुकळे~शेळ्यांना चारा खाऊ घालताना ज्ञानेश्वरी दुकळे