नाशिक- कोरेाना बाधितांवर उपचार करणे अत्यंत अवघड हेाऊन बसले आहे. त्यामुळे कोरोना हाेऊच नये, अशा नागरिकांना आणि गृहविलगीकरणातील नागरिकांना आयुष मंत्रालयाने मान्यता दिलेली होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक औषधे शासन आणि महापालिकेच्या माध्यमातून देण्यात यावी, अशी मागणी महापौर सतीश कुलकर्णी यांनी केली आहे.
यासंदर्भात महापौरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरेाधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना निवेदन पाठवले असून, राज्य सरकारने यासंदर्भात आदेश जारी करावेत, असे नमूद केले आहे.
शहर व जिल्ह्यातील कोरोनाबाबतची परिस्थिती अतिशय बिकट होत चाललेली आहे. यापूर्वी कुटुंबामधील एकच व्यक्ती कोरोनाबाधित होत होती; परंतु सद्यस्थितीत संपूर्ण कुटुंबच बाधित होताना दिसत आहे. सद्यस्थितीत आयुष मंत्रालयाने मान्यता दिलेले होमिओपॅथी व आयुर्वेदिक या पॅथींचाही रुग्णांना कोरोनासारख्या आजारामध्ये औषधोपचार मान्यता दिलेली आहे. त्यामुळे गृहविलगीकरणात असलेले रुग्ण तसेच इतर नागरिक कोराेना बाधित होऊ नयेत, याकरिता होमिओपॅथीची औषधे घरोघरी वितरित केल्यास रुग्णसंख्या कमी होईल व कोरोना झाल्यामुळे जे रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत, अशा रुग्णांना ॲलोपॅथीबरोबरच होमिओपॅथीचे औषध, गोळ्या महानगरपालिका प्रशासनातर्फे वाटण्याकरिता आदेश द्यावेत, असे महापौरांनी निवेदनात म्हटले आहे.