नाशिक - जिल्ह्यात मागील वर्षी सप्टेंबर ते ऑक्टोबर व चालू वर्षी मार्च ते एप्रिल या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे झालेल्या शेतपीके, फळबागांच्या नुकसानभरपाईसाठी शासनाकडून दिली जाणारी रक्कम पदरात पाडून घेण्यासाठी तत्काळ ई-केवायसी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मागील वर्षाप्रमाणेच यावर्षीही अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला होता. यामुळे हजारो हेक्टरवरील शेतपीकांचा चिखल झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आले होता. हाताशी आलेले पीक गेल्याने शेतकऱ्यांवर आभाळ फाटले होते. जिल्हा प्रशासन व कृषी विभागाकडून शेतपीकांच्या नुकसानीचा पंचनामा करून शासनाला पाठविण्यात आला. नुकसानीबाबत शासनाच्या ई-पंचनामा या ऑनलाइन पोर्टलवर बाधित शेतकरी यांची नावे, बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक व इतर माहिती अपलोड करण्यात येत आहे. या अनुषंगाने ज्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेले नाही, त्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात ई-केवायसी करून घ्यावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी केले आहे.
ई-केवायसी केलेल्या शेतकऱ्यांना मिळाली रक्कम
शेतपीकांच्या नुकसानीबाबत शासनाच्या ई-पंचनामा या ऑनलाइन पोर्टलवर अपलोड केलेल्या बाधित शेतकऱ्यांच्या याद्या सर्व तहसिल कार्यालये, तलाठी कार्यालये व बाधित ग्रामपंचयात कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. ज्या बाधित शेतकऱ्यांनी ई-केवायसी तसेच बँक खाते आधार कार्डसोबत संलग्न केले आहे, त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर शासनामार्फत नुकसानीची रक्कम जमा करण्यात आली आहे, अशी माहिती राजेंद्र वाघ यांनी दिली.
‘आधार’ अपडेट करावा
ज्या बाधित शेतकऱ्यांनी अद्याप प्रमाणीकरण (E-KYC) केलेले नाही त्यांनी नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रावर ई-केवायसी करून घ्यावे. त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांचा आधार क्रमांक अद्ययावत नाही त्यांनी आधार क्रमांक तत्काळ अद्ययावत करून घ्यावा व बँक खातेदेखील आधार क्रमांकासोबत संलग्न करून घ्यावेत. जेणेकरून बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये शेतीपीक नुकसानीची रक्कम जमा करण्यास कुठल्याहीप्रकारची तांत्रिक अडचण येणार नाही.