नाशिक : उष्ण तपमानामुळे राज्यातील भंडारा-गोंदिया व पालघर लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीत मतदान यंत्रे बंद पडल्याचा प्रशासन व निवडणूक आयोगाने दावा केला असला तरी, या दोन मतदारसंघांच्या निवडणुकीपूर्वी २४ तास अगोदर नाशिक जिल्ह्यातील २० ग्रामपंचायतींसाठी ७१ मतदान केंद्रांवर मतदान यंत्रांद्वारेच मतदानप्रक्रिया राबविण्यात आली परंतु कोठेही उष्णतेमुळे मतदान यंत्र बंद पडल्याच्या तक्रारी झाल्या नाहीत. विशेष म्हणजे, रविवारी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सरासरी ३९ ते ४३ डिग्री सेल्सिअसपर्यंत तपमान असतानाही त्याचा मतदान यंत्रांवर कोणताही परिणाम झाला नाही. जाणकारांच्या मते मतदान यंत्रावर कोणत्याही हवामानाचा परिणाम होऊ नये याची खातरजमा ज्यावेळी मतदानासाठी मतदान यंत्रे वापरण्याचा निर्णय घेतला त्याचवेळी शास्त्रज्ञ व तंत्रज्ञांनी केली होती.देशपातळीवर चार लोकसभा व दहा विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीसाठी सोमवारी मतदान घेण्यात आले. त्यातील फक्त लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वापरण्यात आलेल्या मतदान यंत्रांतच बिघाड झाल्याच्या तक्रारी झाल्या आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान यंत्रे बंद पडण्याबाबत प्रशासन व्यवस्थेने वेगवेगळी कारणे दिली असली तरी, त्यातील प्रमुख कारण उष्णतेचे देण्यात आले आहे. देशपातळीवर उष्णतेची लाट असली तरी, अलीकडेच कर्नाटक विधानसभेसाठी मतदान घेण्यात आले, त्यावेळी उष्णतेने मतदान यंत्रे बंद पडल्याच्या ठळक तक्रारी पुढे आल्या नाहीत. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी ७१ केंद्रांवर सरासरी ७५ ते ८० टक्के मतदान रविवारी झाले. या मतदानप्रक्रियेत कोठेही यंत्रे बंद पडल्याच्या तक्रारी नसल्याचे निवडणूक शाखेच्या वतीने सांगण्यात आले.नाशिकमध्ये देशातील पहिला प्रयोगसोमवारी देशपातळीवर झालेल्या लोकसभेच्या व विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या मतदान यंत्राला व्हीव्हीपॅट यंत्रे जोडण्यात आली होती. गेल्या काही निवडणुकीत एकाच पक्षाला मिळालेल्या एकगठ्ठा मतांच्या आकडेवारीवरून मतदान यंत्राबाबत व्यक्त केल्या जात असलेला संशय दूर करण्यासाठी निवडणूक आयोगाने यापुढील सर्व निवडणुकीत व्हीव्हीपॅट यंत्रे वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोमवारच्या निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅट वापरण्यात आले असले तरी, त्यामुळेदेखील मतदान यंत्रे बंद पडण्याच्या वा त्यात बिघाड होण्याची शक्यता जाणकारांनी फेटाळून लावली आहे. निवडणूक आयोगाने २०१४ मध्ये मतदान यंत्रे व्हीव्हीपॅटने जोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्टत होत असलेल्या २०१४ च्या विधानसभा निवडणुकीचा मुहूर्त निवडला होता व त्यातही फक्त नाशिक शहरातील नाशिक मध्य, नाशिक पश्चिम व नाशिक पूर्व या तीन विधानसभा मतदारसंघांची यासाठी निवड करण्यात आली. साधारणत: तीनही विधानसभा मतदारसंघांसाठी २५० ते २७५ मतदान केंद्रे होती.यावेळी झालेल्या मतदानासाठी वापरण्यात आलेल्या व्हीव्हीपॅट यंत्राच्या वापरात अवघ्या ५ ते ७ टक्के तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यातही व्हीव्हीपॅटमध्ये मतचिठ्ठी अडकणे, कागदाचा रोल व्यवस्थित न फिरणे अशा स्वरूपाच्या तक्रारी होत्या. परंतु त्यामुळे मतदान यंत्राच्या कंट्रोल व बॅलेट या दोन्ही युनिटला कोणतीही हानी पोहोचली नव्हती.वातावरणाचा परिणाम अशक्यमतदान यंत्रावर कोणत्याही वातावरणाचा परिणाम अशक्य असल्याचा दावा प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळणाऱ्या निवडणूक यंत्रणेने केला आहे. त्यांच्या मते २००६ पासून मतदान यंत्रांचा वापर देशपातळीवरील निवडणुकांसाठी केला जात असून, अतिउष्ण म्हणून ओळखल्या जाणाºया दक्षिणेकडील राज्यांमध्ये या यंत्राचा वापर झाला तसाच गोठवून टाकणाºया थंडीच्या जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्येदेखील वेळोवेळी यंत्राचा वापर झाला. एवढेच नव्हे तर तुफान पर्जन्यवृष्टी होणाºया उत्तरेकडील राज्यांमध्येही त्याचा वापर करण्यात आल्यावर वातावरणाचा मतदान यंत्रांवर परिणाम झाल्याच्या तक्रारी आजवर झाल्या नाहीत. मुळात मतदान यंत्रातील सॉफ्टवेअरवर कसलाही परिणाम होऊ नये अशा व्यवस्थेतूनच मतदान यंत्रांची निर्मिती करण्यात आली असून, यंत्राचे कव्हर अनब्रेकेबल असल्यामुळे आतील सॉफ्टवेअरपर्यंत उष्णता, थंडी पोहोचू शकत नाही. साधारणत: ६० ते ७० डिग्रीवर पारा पोहोचला तरच त्यात काही बिघाड होणे शक्य असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.गेल्या निवडणुकीत नाही तक्रारीसन २०१४ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीसाठी एप्रिल-मे महिन्यात देशपातळीवर मतदानप्रक्रिया राबविण्यात आली. त्यावेळीदेखील सर्वत्र उष्णतेची लाट होती. त्यामुळे उन्हाळ्यामुळे निवडणुकीत मतदानाची टक्केवारी घसरेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र त्यावेळी उष्णतेने कोठेही मतदान यंत्र बंद पडल्याची अथवा बिघाड झाल्याची तक्रार करण्यात आली नसल्याचा दावा जाणकारांनी केला आहे.यंत्राची सक्षमता उत्तमसन २००५ मध्ये निवडणुकीसाठी ईव्हीएम वापरण्याचा निर्णय घेतल्यानंतर सरकारने तंत्रज्ञांची समिती गठित केली होती. या समितीत प्रा. एस. संगथ, प्रा. पी. व्ही. इंदिरेसर, डॉ. सी. व्ही. कासारवडा यांचा समावेश होता. या समितीने केलेल्या ईव्हीएम तपासणीतून कुठल्याही वातावरणात वापरता येणारी यंत्रे असल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच कुठल्याही नेटवर्कशी या यंत्राला जोडलेले नसल्यामुळे ते बंद पडणे, त्यात बिघाड होण्याची शक्यता नसल्याचेही या समितीने म्हटले होते.
नाशकात यंत्रे ठीकठाक, मग पालघरला बिघाड का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 12:36 AM