नाशिक : महापालिका निवडणुकीत यंदा प्रथमच चार सदस्यीय प्रभाग पद्धती अंमलात येत आहे. ३१ पैकी २९ प्रभागांमध्ये प्रत्येकी चार तर २ प्रभागांमध्ये प्रत्येकी तीन उमेदवार निवडून द्यायचे आहेत. या प्रभाग पद्धतीनुसार मतदान कसे करावे, याबाबत निवडणूक आयोगाकडून विविध स्तरावर वेगवेगळ्या माध्यमातून मतदार जागृती केली जात आहे. दरम्यान, मतदान केंद्रांवर पुरविण्यात येणाऱ्या सुविधांचा महापालिका आयुक्तांनी पाहणी करत आढावा घेतला. महापालिका निवडणुकीत यापूर्वी २००२ ते २००७ या काळात तीन सदस्यीय प्रभाग रचना असताना मतदारांनी एकाचवेळी तीन उमेदवारांना मतदान केले होते. आता चार सदस्यीय प्रभाग रचनेमुळे एका मतदाराला चार मते देणे आवश्यक आहे, तर प्रभाग १५ आणि १९ या दोन प्रभागांमध्ये तीन सदस्य असल्याने या भागातील मतदारांना तीन मते द्यावी लागणार आहेत. प्रत्येक प्रभागातील जागेतील उमेदवारांच्या संख्येनुसार आवश्यक असलेल्या बॅलेट युनिटवर प्रत्येक ‘अ’, ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ जागेची मतपत्रिका असणार आहे. मतदाराने ‘अ’ जागेमधील मतपत्रिकेवरील पसंतीच्या उमेदवारासमोरील बटण दाबल्यानंतर लाल दिवा लागेल, त्यावेळी ‘अ’ जागेसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण होईल. याचप्रमाणे ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ जागेवरील पसंतीच्या उमेदवारासमोरील बटण दाबल्यानंतर लाल दिवा लागेल. पूर्ण मते दिल्यानंतर मोठा ‘बिप’ असा आवाज वाजेल तेव्हा चारही जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे मानले जाईल. ३१ प्रभागांपैकी काही प्रभागांमध्ये चार तर काही प्रभागांमध्ये मतदान केंद्रनिहाय तीन व दोन इव्हीएम मशीन असणार आहेत. ज्याठिकाणी दोन किंवा तीन मशीन असतील तेथे एकाच एव्हीएमवर दोन गटांसाठी मतपत्रिका सेट होणार आहे. त्यामुळे एकाच इव्हीएमवर दोनदा बटण दाबावे लागणार आहे. दरम्यान, मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात आल्या असून, त्यासंबंधीचा आढावा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी अभिषेक कृष्ण यांनी घेतला. (प्रतिनिधी)
बहुसदस्यीय रचनेत असे करा मतदान
By admin | Published: February 19, 2017 11:57 PM