नाशिक : जागतिक बाजारात तेलबियांचा तुटवडा असल्यामुळे सोयाबीनचे दर वाढले असले, तरी भाव नियंत्रित करण्यासाठी केंद्र शासनाने सोयाबीनच्या वायदे बाजारावर बंदी घालू नये, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.
शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी या संदर्भात सेबीचे अध्यक्ष अजय त्यागी यांना ई-मेलद्वारे पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे, मागील हंगामात निकृष्ठ बियाणे व अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी १०० टक्के नुकसान झाले असले, तरी सरासरी ३० ते ३५ टक्के नुकसान झालेले आहे. वाढीव दरामुळे शेतकर्यांचा मोठा फायदा होणार नाही, फक्त झालेले नुकसान भरून निघेल.
सोयाबीन प्रक्रिया उद्योग लॉबीकडून सोयाबीनचा वायदे बाजार बंद करण्याचे दडपण सरकारवर येत असले, तरी शेतकरीहित लक्षात घेऊन वायदे बाजारावर बंदी घालणे फायदेशीर ठरणार नाही.
चीनकडून अमेरिकेतील सोयाबीनला मोठी मागणी आहे. तसेच कोविडच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी आपल्या देशातून निर्यात होणार्या तेलावर बंदी घातली आहे किंवा निर्यात शुल्क वाढवले आहे. भारतातील सोयाबीन नॉन जी एम असल्यामुळे भारतातील सोया पेंडीला बर्याच देशात चांगली मागणी आहे.
वायदे बाजारावर बंदी घातल्यास कच्चा माल स्वस्तात मिळेल व काही प्रक्रिया उद्योगांना अवाजवी नफा कमवण्याची संधी मिळेल. वायदे बाजार बंद केल्यास सोयाबीनच्या किमती कोसळतील व शेतकर्यांना तोटा सहन करावा लागेल. बंदी घालून भाव पडल्यास शेतकरी तेलबियांच्या पिकांकडे आकर्षित होणार नाहीत व देशापुढे पामतेल आयात करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.