नाशिक : आगामी महापालिका निवडणुकांत स्वबळावरच भाजपाचा महापौर झाला पाहिजे. त्यासाठी गाफील न राहता सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवा. पक्ष सत्तेत असला की, वेगवेगळ्या पक्षांतील लोक आपल्या पक्षात येतील, त्यांचे मन मोठे करून स्वागत करा, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.येथील स्वामीनारायण मंदिरात भारतीय जनता पक्षाच्या शहर मंडळ पदाधिकाऱ्यांची बैठक, तसेच आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत केवळ भाजपाच्या शहरातील मंडळ व शाखा पदाधिकाऱ्यांना प्रवेश होता. यावेळी व्यासपीठावर जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन, रोहयोमंत्री जयकुमार रावल, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार डॉ. राहुल अहेर, प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, अपूर्व हिरे, प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते, सुनील बागुल, शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, प्रा. सुहास फरांदे, लक्ष्मण सावजी, सुरेश पाटील यांच्यासह भाजपाचे नगरसेवक उपस्थित होते. दोन वाजता सुरू होणारी ही बैठक सव्वा तीन वाजता सुरू झाली. सुरुवातीला लक्ष्मण सावजी व आमदार बाळासाहेब सानप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. त्यानंतर नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत निवडून आलेल्या भाजपा नगरसेवक मंदाबाई ढिकले व सुनंदा मोरे यांचा मुख्यमंत्र्यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यानंतर केवळ मुख्यमंत्र्यांनी अर्धा तास उपस्थिताना मार्गदर्शन केले.
गाफील राहू नका, महापौर भाजपाचाच
By admin | Published: September 09, 2016 1:52 AM