नाशिक: महाराष्ट्रपोलिस दल हे भारताचे सर्वात मोठे व गौरवशाली इतिहास असलेले दल आहे. या दलाचा नावलौकिक उंचावत आज पोलिस अधिकारी म्हणून घेतलेली शपथ कायम निभवावी. सेवाकाळात कुठल्याही प्रलोभनाचे बळी ठरू नये, असा मौलिक सल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४९४ नवनिर्वाचित पोलिस उपनिरिक्षकांना दिला.
महाराष्ट्र पोलिस अकादमीमधील प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरिक्षकांच्या सत्र क्र.१२२चा दीक्षांत सोहळा मोठ्या दिमाखात शनिवारी (दि.५) पार पडला. यावेळी ३४९ पुरूष व १४५ महिला प्रशिक्षणार्थींनी पोलिस उपनिरिक्षक म्हणून शपथ घेतली. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, पोलिस अधिकारी म्हणून वंचित, गरजू, पिडित घटकांचे दु:ख संवेदना जागृत ठेवून समजून घेत त्यांना योग्य ती मदत देत कर्तव्य पार पाडावे. भारताचे संविधान हे सर्वोच्च असून सेवाकाळात कुठलाही पक्षपातीपणा जात, धर्म, पंथ, लिंगभेद न करता महाराष्ट्र पोलीस दलाचा नावलौकिक वाढविणारी सेवा बजावण्याची जबाबदारी आता तुमच्या खांद्यावर आली आहे, हे लक्षात असू द्यावे, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
बदलत्या काळानुरूप पोलिस दलापुढे नवनवीन आव्हाने असून सायबर गुन्हेगारी व त्यातून होणारी आर्थिक फसवणूक हे मोठे आव्हान आपल्याला पेलावे लागणार आहे, यामुळे सतत स्वत:ला चौकस ठेवावे, असा कानमंत्रही त्यांनी पोलिस उपनिरिक्षकांना दिला. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, डॉ.राहुल आहेर, राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ, राजकुमार वडकर, अर्चना त्यागी, जिल्ह्याचे विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ.बी.जी.शेखर-पाटील, अकादमीचे संचालक तथा अपर पोलीस महासंचालक राजेश कुमार, अधीक्षक शहाजी उमाप आदी मान्यवर उपस्थित होते. प्रशिक्षणार्थी उपनिरिक्षकांच्या आठ तुकड्यांना पोलीस सेवेची शपथ राजेश कुमार यांनी दिली.
रजनीश सेठ यांनी दिला गुरूमंत्र
पोलीस दलाचे ब्रीद कायम लक्षात असू द्यावे. पोलीस ठाण्यात येणाऱ्या व्यक्तीच्या मनात पोलीस दलाविषयीची विश्वासार्हता वाढीस लागेल, असे आपले वर्तन ठेवावे. गुन्ह्याची नोंद करण्यास प्राधान्य द्यावे, गुन्हा दडपला जाणार नाही, याबाबत दक्ष रहावे. कायद्याला अभिप्रेत प्रक्रियेतून गुन्ह्याचा सखोल तपास करत सबळ पुराव्यानिशी दोषारोपपत्र न्यायालयात सादर करावे. पोलीस दलाविषयी मनात सदैव निष्ठा बाळगावी, असे गुरूमंत्र यावेळी राज्याचे महासंचालक रजनीश सेठ यांनी दिले.
अभिजीत काळे यांना मानाची रिव्हॉल्वर!
१२ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पुर्ण करत या कालावधीत उत्कृष्ट कामगिरी करून प्रशिक्षणार्थींपैकी सर्वाधिक गुण मिळवून अष्टपैलू व उत्कृष्ट कामगिरी करत मानाच्या रिव्हॉल्वरचे मानकरी परेड कमांडर अभिजीत भरत काळे हे राहिले. तसेच अष्टपैलू महिला कॅडेट म्हणून डाॅ. रेणुका परदेशी यांनी अहल्यादेवी होळकर चषकावर नाव कोरले. बेस्ट कॅडेट इन स्टडीज, इन लॉमध्ये पारितोषिक मिळवत सिल्वर बॅटन व यशवंतराव चव्हाण सुवर्ण चषकावर किरण देवरे यांनी मोहर उमटविली. तसेच द्वितीय उत्कृष्ट प्रशिक्षणार्थीचा मानही मिळविला. उत्कृष्ट ड्रील अभ्यासात रुबीया ताजुद्दीन मुलाणी यांनी बाजी मारली. उत्कृष्ट गोळीबार व नेमबाजीत प्रशांत बोरसे यांनी प्राविण्य मिळविले.