त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करून वर्षे उलटली, परंतु अद्याप एका बाजूचे कामही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे ज्या बाजूने रस्त्याचे काम सुरू आहे, त्या मार्गावरील शाळा, व्यावसायिक आणि रहिवाशांचे पुरते हाल चालू आहे. कोणत्याही प्रकारचे रस्त्याचे काम सुरू असले की ते रखडल्यानंतर नागरिकांना त्रास होतोच, परंतु या रस्त्याचे काम वेळेत पूर्ण व्हावे ही त्रास सहन करणाऱ्यांची अपेक्षा असते. सध्या सुरू असलेले काम वर्षभरापासून रेंगाळले असून, अवघे एक किलोमीटरचे काम एका वर्षात पूर्ण होऊ शकलेले नाही. स्मार्टरोडची संकल्पना उत्तम असली तरी आता नागरिकांचा संयमाचा कडेलोट होत असून, अंत बघू नये अशी अपेक्षा नागरिकांनी प्रतिनिधिक स्वरूपात व्यक्त केली आहे.स्मार्ट सिटी अंतर्गत गावठाणाला जोडलेला भाग म्हणून त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ दरम्यान स्मार्टरोडचा पथदर्शी प्रकल्प महापालिका राबवित आहे. १.१ किलोमीटरचा हा पथदर्शी रस्ता असून, कॉँक्रीटीकरणाच्या या रस्त्याच्या दुतर्फा पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक, हिरवळ अशा प्रकारच्या सुविधांबरोबरच वायफॉय, स्मार्ट बसथांबे, पब्लिक अॅड्रेसेबल सिस्टीम अशा सर्वसुविधा असणार आहेत. शहर स्मार्ट करावा आणि रस्ता चांगला व्हावा याविषयी कोणाचे दुमत नाही. परंतु एखाद्याच्या रस्त्याचे काम होणार असेल तर विशेषत: त्यावर शाळा, महाविद्यालये आणि हजारो नागरिकांचा राबता असेल, अशी शासकीय कार्यालये अशाप्रकारचा रस्ता असेल तर त्यावर काम करण्यापूर्वी अत्यंत काळजीपूर्वक नियोजन करणेदेखील आवश्यक असते. परंतु तसे नियोजन झाले नाही, असा आरोप आहे. आता एका बाजूने काम पूर्ण होत असतानादेखील नागरिकांचे हाल संपलेले नाही. व्यावसायिकांचे व्यवसाय ठप्प झाले असून रहिवाशांनादेखील आपल्या घरी जाणे मुश्कील झाले आहे. त्यापार्श्वभूमीवर महापालिकेने उर्वरित रस्त्याचे काम करताना तरी नागरिकांना किंवा संबंधित घटकांना शासकीय कार्यालये किंवा शाळा महाविद्यालयात किंवा घरात जाण्यासाठी पर्यांयी मार्गाचे नियोजन करावे, वाहतुकीचे अचूक नियोजन करावे आणि मुख्य म्हणजे रस्त्याचे उर्वरित काम तरी वेगाने पूर्ण करावे तरच रस्त्याचे काम वेळेत होईल, असे मत विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी लोकमतच्या विचार-विमर्शच्या व्यासपीठावर व्यक्त केले. या चर्चेत स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थवील, स्मार्ट सिटीचे संचालक आणि महापालिकेतील कॉँग्रेस पक्षाचे गटनेते शाहू खैरे, पश्चिम प्रभाग समितीच्या सभापती अॅड. वैशाली भोसले, नाशिक वकील संघाचे सहसचिव अॅड. शरद गायधनी, अॅड. दीपक पाटोदेकर, सीबीएसवरील द न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे संचालक अॅड. रवींद्र कदम, बाल विद्या मंदिराचे मुख्याध्यापक रमेश आहिरे, आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापक संध्या भातखंडे, वाय डी बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनि. कॉलेजच्या मुख्याध्यापक मीना वेळुंजे, व्यावसायिक नाशिक वडापावचे संचालक निवास मोरे, हॉटेल प्रियाचे संचालक रंगा राव आदी मान्यवर चर्चेत सहभागी झाले होते.संपूर्ण रस्ता एका वेळी न मिळाल्यानेच काम रखडलेस्मार्ट सिटीतील प्रस्तावित कामे वेगाने व्हावीत यासाठी स्पेशल परपज व्हेईकल म्हणून नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामार्फत सध्या त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ रस्त्याचे काम सुरू आहे. मुळात शहरात कोणती कामे केली जावी हे नागरिकांच्या सूचनेवरूनच ठरविण्यात आले आहे. त्याअंतर्गत आणि स्मार्ट सिटी कंपनीच्या निकषानुसार हे काम करण्यात येत आहे. काम वेळेत पूर्ण करण्यासाठी पूर्णत: नियोजन करण्यात आले आहेत. दोन शाळांना पाठीमागील बाजूने पर्यायी मार्ग देण्यात आला. तसेच वाहतुकीलादेखील पर्याय मिळाले. एका बाजूचा संपूर्ण मार्ग एकाच वेळी मिळाला असता तर काम लवकर झाले असते. मात्र गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळी यामुळे एकाबाजूचा पूर्ण रस्ता मिळाला नाही. त्यातच रस्त्याच्या खोदकामात ब्रिटिश कालीन जिवंत सांडपाणी-मलवाहिका आढळली. तसेच अनेक तांत्रिक अडचणीदेखील आल्या. त्यामुळे रस्त्याच्या कामाला विलंब झाला. परंतु आता उर्वरित रस्त्याचे काम वेगाने करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीदेखील नियोजन करण्यात आले आहे. एकदा रस्ता चांगला झाल्यानंतर तो इतका प्रेक्षणिय होईल की लोक पर्यटन म्हणून पाहण्यासाठी येतील. - प्रकाश थविल, सीईओ स्मार्ट सिटी कंपनीस्मार्टरोडमुळे व्यावसायिकांवर आत्महत्येची वेळमहापालिकेने स्मार्टरोडचे काम करताना परिसरातील व्यावसायिक, रहिवासी यांना विश्वासात घेतलेले नाही. त्यामुळे रस्त्याचे काय काम सुरू आहे आणि काय नाही हे सर्वसामान्य नागरिकांना कळण्याचा प्रश्नच नाही. आताही रस्त्याचे काम अत्यंत संथगतीने चालते. कित्येकदा सायंकाळनंतरच काम बंद होऊन जाते. अनेकदा रस्त्याच्या कामामुळे केबल उखडून वीजपुरवठा खंडित होतो, तर कित्येकदा टेलिफोनच्या लाइन बंद होतात. असा प्रकार सुरू आहे. आज रस्त्याच्या कामामुळे सर्वच दुकानदारांची अवस्था बिकट झाली असून, रस्त्याच्या कामामुळे कुठे तरी दूरवर गाड्या उभ्या करून येण्याची सोय नसल्याने ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे रस्त्याचे काम ठप्प झाले आहे. त्याहीपेक्षा गंभीर म्हणजे रस्ता स्मार्ट करताना त्यावर वाहनतळाची जागा कोठेही सोडलेली नाही. त्यामुळे नागरिकांना वाहनेच उभी करता आली नाही, तर या मार्गावरील दुकानदारांकडे कोणीच येणार नाही आणि आत्महत्या करण्याची वेळ व्यावसायिकांवर येणार आहे. गेल्या तीन ते चार पिढ्यांपासून हा व्यवसाय सुरू आहे. परंतु आता केवळ पार्किंगच नसल्याने व्यवसाय ठप्प होण्याची भीती निर्माण झाली आहे. रस्त्यांची उंची जास्त आणि इमारतींची उंची कमी झाली आहे. त्यामुळे पावसाळ्यात इमारतींमध्ये पाणी जाण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे.- निवास मोरे, रंगा राव, व्यावसायिककमान पडली, पण भरपाईही नाहीस्मार्ट सिटीच्या वतीने रस्त्याचे काम करताना कोणत्याही प्रकारचे नियोजन करण्यात आलेले नाही. तसे असते तर तीन महिन्यांत रस्त्याचे काम पूर्ण झाले असते. एकाच मार्गावर शहरातील एकाच मार्गावर चार जुन्या आणि महत्त्वाच्या शाळा आहेत. त्याच्या विद्यार्थ्यांचे काय होईल किंवा पर्यायी सोय काय करावे लागेल याचे कोणतेही नियोजन नाही. कंपनी पोलीस खाते यांचा समन्वय नाही. रस्त्याच्या कामामुळे शाळेच्या प्रवेशद्वाराशी असलेल्या कमानीला तडे गेले आणि ती पाडावी लागली. त्यामुळे संस्थेची रात्र शाळा, कॉलेज याची माहितीच मिळणे नागरिकांना बंद झाल्याने संस्थेची विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. सदरची कमान बांधून देण्याची मागणी करूनदेखील कंपनीने काहीच प्रतिसाद दिलेला नाही. शिक्षण संस्था या राजकीय नसल्याने त्यांना आंदोलनेदेखील करता आलेले नाही.- रवींद्र कदम, संचालक, सीबीएसवरील द न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूटविद्यार्थ्यांची वाहतूक धोकादायक होणारआमच्या शाळेत साडेतीन हजार मुले आहेत. स्मार्ट सिटीचे काम येथे सुरू झाल्यापासून अनेक अडचणी येत आहे. शाळेच्या समोरच रस्त्याच्या प्लास्टरिंगचे काम सुरू असून, ७ मार्चपर्यंत तेथे वाहने उभी करायची नाही, असे कंपनीने बजावले आहे. परंतु शाळेत मुले-मुलींना सोडण्यासाठी शंभर व्हॅन येतात. त्या कुठे उभ्या करायच्या. कान्हेरेवाडी येथे रिक्षाचालक वाहने उभी करू देत नाही. सिग्नल असल्याने त्याठिकाणाहून मुलांना कसे आणायचे हा प्रश्न आहे. दुसरीकडे संस्थेच्या चौदा स्कूल बस असून, त्या कुठे उभ्या करायच्या हा मोठा प्रश्न आहेत. तूर्तास पोलीस यंत्रणेने आणि कंपनीने प्रिया हॉटेलजवळ एक बस आली की तेथून मुले घेऊन आल्यानंतर ती बस काढावी आणि पुन्हा नवीन बस तेथे आणायची ही सूचना केली आहे. परंतु एखादा अपघात घडला तर त्याला जबाबदार कोण राहणार हादेखील प्रश्न आहे. शाळेच्या शिक्षकांनादेखील वाहने आणणे कठीण झाले आहे. तेथे विद्यार्थ्यांना कसे आणणार हा प्रश्न आहे. त्यामुळे हा तिढा तातडीने सोडविण्याची गरज आहे. किमान सीबीएस येथील जंक्शनचे काम कंपनीने आता हाती घेऊन सिग्नल बंद केले तर ते सोयीचे तरी होईल.- रमेश आहिरे, मुख्याध्यापक, बाल विद्या मंदिर, सीबीएस
स्मार्टरोडसाठी आता अंत पाहू नये!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 1:10 AM