नाशिक : आध्यात्मिक कार्य करताना कोणत्याही परिस्थितीत पैसा येता कामा नये, असा सल्ला आपल्याला आपल्या गुरूंकडून मिळाला असल्याचे सांगताना अध्यात्माचा विचार पुढे नेताना जीवनात अध्यात्म आणि पैसा यांची कधीही सांगड घालू नये, असे प्रतिपादन शास्त्रशुद्ध भक्तिमार्गाचे प्रचार व प्रसारक राहुल फाटे यांनी केले.शंकराचार्य न्यायासाच्या डॉ. कुर्तकोटी सभागृहाच शिवपार्वती प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांचे शुक्रवारी (दि.२२) स्वामिनी स्थितप्रज्ञानंद सरस्वती यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. याप्रसंगी राहुल फाटे यांना शास्त्रशुद्ध भक्तिमार्गाचे प्रचार व प्रसारासाठी पुण्यश्लोक सदगुरू शिवपार्वती आध्यात्मिक पुरस्काराने गौरविण्यात आले, तर पुणे येथील भाऊ आठल्ये यांना श्रीराम पराडकर वैदिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गाणगापूरचे वेदमूर्ती प्रदीपभट पुजारी यांना नंदलाल जोशी वेदवेदांग पुरस्कार देण्यात आला तर नाशिकच्या मृणालिनी फाटे यांना डॉ. मो. स. तथा आप्पासाहेब गोसावी लोकसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पुरस्काराला उत्तर देताना राहुल फाटे यांनी जीवनातील चक्रांचे महत्त्व विशद केले. यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना डॉ. मो. स. गोसावी यांनी एकविसावे शतक ज्ञानाचे असून, भावीपिढीने आद्यशंकराचार्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ज्ञानसाधना करण्याची गरज व्यक्त केली. दरम्यान, प्रतिष्ठानतर्फे ‘शिवज्योती’ विशेषांकाचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. लक्ष्मीकांत जोशी यांनी केले. प्रा. के. आर. शिंपी यांनी आभार मानले.अनुबंधी दाम्पत्यांचा गौरव शिवपार्वती प्रतिष्ठान तर्फे डॉ. मो. स. गोसावी व सुनंदाताई गोसावी यांच्यासह डॉ. अनिता व डॉ. शरद पाटील, डॉ. मनीषा व डॉ. प्रभाकर राणे, शोभा व सुरेश जोशी, शोभा व सीए एस. व्ही. गिंडे, चारुशीला व अॅड. एम. वाय. काळे या अनुबंधी दाम्पत्यांचाही गौरव करण्यात आला.आदर्श संस्था पुरस्कारमहर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठान नाशिक या संस्थेचा आदर्श संस्थेच्या पुस्काराने सन्मानित करण्यात आले, तर गायिका वैष्णवी नेरीकर यांना वैदही सर्जनशीलता पुरस्कारासोबतच सृष्टी पगारे व राशी पगारे या विद्यार्थिनींना विशेष प्रज्ञावंत पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे प्रणीता इंगळे, सोनिया शेख, वैष्णवी सरकाटे, ओम माने, यश टेलर, प्रज्ञा डागा, विक्रांत मेहता, प्रांजल कुलकर्णी व रणजित शर्मा यांना गुणवंत व प्रज्ञावंत पुरस्कार प्रदान करण्यात आले.
जीवनात अध्यात्म, पैसा यांची सांगड घालू नका : राहुल फाटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 11:43 PM