नाशिकरोड : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, असे प्रतिपादन पीपल्स रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार, प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केले.नाशिक येथे एका मोर्चासाठी आलेल्या जोगेंद्र कवाडे यांनी पत्रकारांशी बोलताना मात्र ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, असे सांगितले. कोपर्डीच्या घटनेचा सर्वांत पहिले पीपल्स रिपाइंने निषेध केला. पीडित व अत्याचार करणाऱ्याला जात नसते. विकृत मनोवृत्तीमुळे अशा दुर्दैवी घटना घडतात. या विकृतीविरुद्ध सर्वांनी मिळून लढा उभारला पाहिजे, असे कवाडे यांनी सांगितले. मराठा समाजाचा मोर्चा हे कोपर्डीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर निघत आहेत. मात्र, सत्ता गेलेले राजकारणी स्वत:च्या राजकीय स्वार्थाकरिता पडद्यामागून मोर्चाची सूत्रे हलवत आहे. ३४ वर्षे सत्ता होती तेव्हा अॅट्रॉसिटी रद्द करण्याची मागणी केली नाही आणि आता करू लागले आहेत. शरद पवार यांनी प्रथम यावर भाष्य करून ठिणगी टाकली व वणवा पेटला, असा आरोप कवाडे यांनी केला. नाशिक येथे काही दिवसांपूर्वी बंजारा समाजाच्या पाच वर्षांच्या मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चात प्रा. कवाडे सहभागी झाले होते. बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ काढलेला आक्रोश मोर्चा हा शासनाला समाजाच्या वेदना समजाव्या म्हणून काढला होता, असे कवाडे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का नको : कवाडे
By admin | Published: September 23, 2016 1:55 AM