नाशिक : शहरातील विविध सिग्नलवर वाहतूक शाखेने खासगी प्रायोजकांमार्फत ‘झेब्रा क्रॉसिंग ओलांडू नका’ ‘नियम पाळा, अपघात टाळा’ असे फलक नव्याने लावले आहेत. तसेच सिग्नलवर ‘ड्युटी’ बजावणारे वाहतूक पोलीसदेखील झेब्राच्या नियमाविषयी सतर्क झाले असून, वाहनचालकांना झेब्राच्या अगोदरच ‘स्टॉप लाइन’वर थांबविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.शहरातील सर्वच सिग्नलवर झेब्रा पट्टे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी वाहतुकीच्या नियमानुसार रंगविण्यात आले आहे; मात्र या झेब्रा पट्ट्यांवरून पादचाऱ्यांना मार्गस्थ होण्याचा ‘मुहूर्त’च लाभत नव्हता; कारण शहरातील बेशिस्त रिक्षाचालक आणि दुचाकीस्वार कधीच झेब्रा पट्ट्याच्या अलीकडे वाहन थांबविण्याची तसदी घेत नव्हते. त्यामुळे झेब्रावर पादचारी नव्हे तर वाहनेच थांबल्याचे चित्र शहरातील सीबीएस, गडकरी चौक, तरण तलाव, जुना गंगापूरनाका, त्र्यंबकनाका, मेहेर चौक, टिळकवाडी, कॅनडा कॉर्नर, उंटवाडी आदि सिग्नलवर पहावयास मिळत होते. पोलीस उपआयुक्त विजय पाटील यांनी झेब्रा पट्ट्याच्या नियमांचे पालन करण्यासाठी शहर वाहतूक शाखेचे कान टोचल्याने सर्वच सिग्नलवर वाहतूक पोलिसांकडून आता झेब्रावर उभ्या असलेल्या वाहनांकडे काणाडोळा करण्याऐवजी वाहनांना मागे ‘स्टॉप लाइन’वर थांबविण्याचा प्रयत्न होत आहे. शनिवारी (दि.२७) संध्याकाळी पाच ते सात वाजेच्या दरम्यान, वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांकडून जुना गंगापूर नाका सिग्नलवर मोहीम राबवित झेब्रा पट्टा, सिग्नल, यू-टर्न आदि प्रकारे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मुजोर रिक्षाचालक, बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. थांबविण्याची स्वयंशिस्तीने नागरिकांनी झेब्रा पट्ट्याच्या आत वाहने थांबवून वाहतुकीच्या नियमांचे पालन करत आपले शहराला ‘आदर्श नाशिक, सुंदर नाशिक’ बनविण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. केवळ कारवाईच्या धाकाने वाहतुकीचे नियम पाळू नयेत तर स्वत:च्या सुरक्षिततेबरोबरच अन्य नागरिकांच्याही सुरक्षेचा विचार करत वाहतुकीचे नियम पाळण्यास प्राधान्य द्यावे, असे पाटील यांनी सांगितले आहे. (प्रतिनिधी)
वाहने ‘झेब्रा’वर थांबवू नका..
By admin | Published: August 27, 2016 11:51 PM