नाशिक : थॅलेसेमिया असो की कॅन्सर अशा कुठल्याही दुर्धर आजाराशी लढा देताना कधीही स्वत:ला एकटे समजू नये. आपण एकाकीपणे या आजाराशी झुंज देत आहोत, असा गैरसमज मनातून काढून टाकावा. समाजातील संवेदनशील मनाचे अनेक हात मदतीसाठी उभे आहेत, असे प्रतिपादन मॅक्स फाउण्डेशनच्या विभागप्रमुख व ‘बिर्इंग ह्युमन’च्या विश्वस्त विजी व्यंकटेश यांनी केले. अर्पण थॅलेसेमिया सोसायटी व एच.सी.जी. मानवता कॅन्सर सेंटरच्या संयुक्त विद्यमाने थॅलेसेमियाग्रस्त बालक व त्यांच्या पालकांसाठी आयोजित ‘दिवाळी मेळा’ व ‘बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट’ केंद्राच्या शुभारंभप्रसंगी बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर अभिनेत्री शिल्पा शिंदे, डॉ. राज नगरकर, अर्पण सोसायटीचे अध्यक्ष नरेंद्र शाह, सचिव नंदकिशोर तातेड, डॉ. अतुल जैन, डॉ. गिरीश बदारखे, डॉ. नीलेश वासेकर आदी उपस्थित होते. या केंद्रात भौतिक व वैद्यकीय अद्ययावत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या केंद्रात सात ते दहा खाटा असून, कें द्रात बदारखे, वासेकर हे तज्ज्ञ डॉक्टर थॅलेसेमियाग्रस्त बालकांवर मोफत उपचार करणार असल्याचे यावेळी नगरकर यांनी सांगितले. यावेळी शिल्पा शिंदे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, बॉलिवूडमध्ये सगळेच ‘हिरो’ असतात असे नाही तसेच वैद्यकीय क्षेत्रातदेखील सगळेच डॉक्टर ‘हिरो’ नसतात. जे समाजाच्या संवेदनांची जाणीव ठेवून वैद्यकीय पेशासोबत प्रामाणिक राहून कर्तव्य बजावतात तेच खरे ‘हीरो’ ठरतात. थॅलेसेमिया हा आजार रक्ताशी संबंधित असून, यासाठी मी रक्तदान वेळोवेळी करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी माझ्या रक्ताची मात्रा अधिक चांगली टिकवून ठेवण्याकरिता मी योग्य व पौष्टिक आहार व व्यायामावर भर देत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, शिंदे, व्यंकटेश यांचे स्वागत थॅलेसेमियाग्रस्त बालकांच्या हस्ते करण्यात आले. उच्चशिक्षण घेत यशोशिखर सर करणाऱ्या थॅलेसेमियाग्रस्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. प्रास्ताविक नगरकर यांनी केले.अत्याचाराविरुद्ध वेळीच आवाज उठवावा : शिंदेअन्याय-अत्याचाराविरुद्ध वर्षानुवर्षे गप्प राहून त्यानंतर ‘मी-टू’सारख्या चळवळीचा जन्म होण्याची प्रतीक्षा करणे योग्य नाही. अन्याय व अत्याचाराविरुद्ध वेळीच आवाज उठविणे गरजेचे आहे. समाजाच्या विकासासाठी ‘मी-टू’ चळवळ राबविली गेली पाहिजे. समाजातील विविध घटकांना मदतीच्या हातांची गरज आहे, त्याचा विचार करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
‘थॅलेसेमिया’च्या लढ्यात एकटे समजू नका : विजी व्यंकटेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2018 12:42 AM