नाशिक : पक्षात कधीपासून काम करतात, कोणती कामे केली, त्याचबरोबर निवडणुकीसाठी किती खर्च करू शकाल, असे इच्छुकांना प्रश्न करीत भाजपाच्या मुलाखतींना प्रारंंभ झाला. खर्चाच्या प्रश्नावर सर्वच उमेदवार पक्ष सांगेल तेवढा खर्च करू, असे सांगत असतानाच एका माजी नगरसेवकाने एक कोटी रुपये, असे दणक्यात उत्तर दिल्याने मुलाखतकर्ते थक्कच झाले. त्याचवेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे छायाचित्र दाखवून आपण यांना ओळखतात का? असा सवाल करण्यात आल्यानंतर आयारामांची भंबेरी उडाल्याचे पहावयास मिळाले. महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपाच्या वसंतस्मृती कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी एक ते दहा प्रभागांसाठी सुमारे अडीचशे उमेदवारांच्या मुलाखती रात्री उशिरापर्यंत घेण्यात आल्या. केंद्र आणि राज्यात भाजपाची सत्ता आल्याने भाजपात आयारामांची गर्दी वाढली असून, गेल्यावेळी स्वबळावर निवडणूक लढविताना दमछाक झालेल्या भाजपाकडे यंदा ३१ प्रभागांसाठी सातशे अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे उमेदवारी देताना भाजपाने तोंडी मुलाखतीचे तंत्र स्वीकारले. यावेळी उमेदवारांना प्रभागाची माहिती, तेथील लोकसंख्या, पक्षाचे किती वर्षांपासून काम करतात, असे विचारतानाच निवडणुकीसाठी किती खर्च करणार, असाही प्रश्न थेट करण्यात येत होता. प्रत्येक इच्छुक आपल्या ऐपतीनुसार खर्चाचे गणित मांडत होते. काहीजण पक्ष सांगेल तेवढा खर्च करणार असल्याचे सांगत होते. भाजपाच्या एका माजी नगरसेवकाने एक कोटी रुपये खर्च करणार, असे सांगितल्याची भाजपावर्तुळात चर्चा आहे. या उमेदवाराचे आर्थिक योगदानाची तयारी बघितल्यानंतर मुलाखतकर्तेही थक्क झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, याचवेळी कार्यालयात लावलेल्या पंडित मदन मोहन मालवीय आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या तसबिरी दाखवून आपण यांना ओळखतात का, असा प्रश्न केल्यानंतर परपक्षातून आलेल्या अनेक उमेदवारांची भंबेरी उडाली होती. भाजपाकडे अनेक प्रभागात एकेका प्रभागासाठी दहापेक्षा अधिक उमेदवार होते. काही प्रभागात वीस ते पंचवीस इच्छुक असून, अवघ्या पाच ते सात मिनिटांत मुलाखती उरकण्यात आल्या. भाजपाचे प्रदेश संघटनमंत्री किशोर काळकर, शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, अपूर्व हिरे, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, उपाध्यक्ष वसंत गिते, सुनील बागुल, प्रवक्ते प्रा. सुहास फरांदे, शहर सरचिटणीस प्रशांत जाधव, महिला शहराध्यक्ष रोहिणी नायडू, संजय गालफाडे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मुखर्जी, पंडित उपाध्याय यांना ओळखतात का?
By admin | Published: January 18, 2017 12:21 AM