जिल्ह्यात ६२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होत आहे. ३० डिसेंबरपर्यंत उमेदवार ऑनलाइन पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करू शकणार आहेत. अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबतची माहिती तहसील कार्यालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये निवडणूक लढविण्यासाठी संबंधित इच्छुकाला शैाचालय वापरत असल्याचा पुरावा म्हणून ग्रामसभेचा ग्रामसेवकाने दिलेला ठराव, शौचालय वापरत असल्याबाबत ग्रामसेवकाने दिलेले प्रमाणपत्र किंवा शौचालय वापरात असल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र इच्छुक उमेदवाराला जोडावे लागणार आहे.
आयोगाच्या नियमाप्रमाणे दोन अपत्ये असल्याबाबत ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र, जात वैधतेबाबतची हमी किंवा प्रमाणपत्र तसेच राष्ट्रीयीकृत बँकेचे स्वतंत्र बँक खाते, ठेकेदार नसल्याबाबतचे घोषणापत्र आदी अनेक छोटी-मोठी कागदपत्रे जोडावी लागणार आहेत. परंतु, नुसते शौचालय आहे म्हणून नव्हे तर शौचालय वापरत असल्याचे स्वयंघोषणापत्र द्यावे लागणार आहे.
हागणदारीमुक्त अभियानाच्या अंमलबजावणीसाठी अशा प्रकारचा नियम स्थानिक स्वराज्य संस्थांना बंधनकारक करण्यात आलेला आहे. गावांमध्ये शौचालय बांधण्यासाठी आणि वापरासाठी शासनाकडून प्रोत्साहन दिले जाते. त्या अनुषंगाने उमेदवारी अर्जासाठी नियम करण्यात आले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या नियम व अटी यांची अंमलबजावणी होण्यासाठी तालुका पातळीवर तहसीलदारांनी निवडणूक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नियमांचे पालन करण्याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत.