नाशिक : शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला असताना दुसरीकडे मात्र ‘रेमडेसिविर’चा काळाबाजार करताना एका डॉक्टरला अन्न औषध प्रशासन व पोलिसांच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे.कोरोना रुग्णांसाठी उपयोगी ठरणारे रेमडेसिविर इंजेक्शन रुग्णांना मिळत नसल्याने संताप व्यक्त होत असताना अमृतधाम भागात एक खासगी डॉक्टरच रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करत असल्याचे उघडकीस आले आहे. रेमडेसिविर इंजेक्शन २५ हजारांना विकणाऱ्या संशयित डॉ. रवींद्र श्रीधर मुळक (४०) यांंना पंचवटी पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा अमृतधाम भागातून ताब्यात घेतले आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, मुळक यांनी तीन रेमडेसिविर इंजेक्शन असल्याचे तक्रारदारास सांगितले होते. एका रेमडेसिविर इंजेक्शनची किंमत २५ हजार रुपये असल्याचेही सांगितले. त्यानुसार तक्रादाराने खरेदीची तयारी दर्शविली. ५ हजार रुपये कमी पडत असल्याचे सांगत एटीएममध्ये जाऊन येतो, असे सांगून तक्रारदाराने १०० क्रमांकावर कॉल करत थेट पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. घटनेची माहिती पंचवटी पोलिसांना कळविण्यात आली. पोलीस पथकाने अन्न औषध प्रशासनाच्या पथकाला सोबत घेत घटनास्थळ गाठले. तेथे एका कारमध्ये मुळक हे रेमडेसिविर इंजेक्शनच्या तीन बाटल्या (वायल्स) घेऊन ग्राहकाची येण्याची प्रतीक्षा करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांच्या कारची झडती घेऊन इंजेक्शनच्या तीन बाटल्या जप्त केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी सांगितले. पंचवटी पोलिसांनी तक्रादाराच्या मदतीने मुळक यांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. पंचवटी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
रेमडेसिविरचे ‘ब्लॅक’ करताना डॉक्टर ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 1:30 AM
शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला असताना दुसरीकडे मात्र ‘रेमडेसिविर’चा काळाबाजार करताना एका डॉक्टरला अन्न औषध प्रशासन व पोलिसांच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे.
ठळक मुद्देअन्न औषध प्रशासन व पोलिसांची कारवाई