----
नाशिक : सातपूर परिसरात एका रुग्णालयात उपचारादरम्यान रुग्ण दगावल्याच्या कारणामुळे अचानकपणे संतप्त झालेल्या दोघा अनोळखी इसमांनी येऊन डॉक्टरांवर हल्ला चढविल्याची घटना कार्बननाका परिसरात घडली. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक महिती अशी, कार्बन नाका परिसरात असलेल्या सुशीला रुग्णालयाबाहेर पीडित डॉक्टर उमाकांत वाघ हे ऑक्सिजनचा साठा तपासण्यासाठी गेले असता, दोघा अनोळखी हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. लथाबुक्क्यांनी दोघांनी वाघ यांना बेदम मारहाण केली. ‘तुम्ही रुग्णालयाबाहेर पडा, तुमचा बेत पाहू,’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादी डॉ.राजेंद्र अरुण भोई (३९,रा.पांडवनगर) यांनी फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना सोमवारी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. मयत रुग्ण हसन मणियार यांच्या उपचारांचे बिलाची रक्कम अदा करण्यावरून कुरापत काढत डॉक्टर वाघ यांना मारहाण अज्ञात इसमानी केल्याचे भोई यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी सातपूर पोलिसांनी वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा, व्यक्ती हिंसक कृत्य व मालमत्तेचे नुकसान, हानी यास प्रतिबंध अधिनियम कलम-४ सह साथरोग कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.