सिन्नर : डॉक्टरांवर होत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने पुकारलेल्या राज्यव्यापी बंदला सिन्नर तालुका वैद्यकीय व्यावसायिक सेवाभावी संघटना आणि आयएमए सिन्नर यांनी पाठिंबा दिला आहे. शुक्रवारी सकाळी येथील पंचवटी हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत सर्व रुग्णालये बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉक्टर देव नसून माणूसच आहे आणि ते सर्वसामान्यांच्या सेवेसाठी अहोरात्र परिश्रम घेतात. त्यामुळे त्यांच्यावर होणारे भ्याड हल्ले निंदनीय असल्याचे डॉ. विजय लोहारकर यांनी सांगितले. विविध ठिकाणी डॉक्टर व रुग्णालयांवर होत असलेल्या हल्ल्यांचा यावेळी तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला. डॉ. सागर सदगीर आणि डॉ. संदीप शिंदे यांनी डॉक्टरांसंबंधी सुरू असलेल्या तपासणी मोहिमेबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी ज्येष्ठ धन्वंतरी डॉ. बी.एन. नाकोड, डॉ. अशोक सोनवणे, डॉ. जी.एल. पवार व्यासपीठावर उपस्थित होते. डॉक्टरांच्या सन्मानार्थ संस्था नेहमी अग्रेसर आणि कटिबद्ध राहील, अशी ग्वाही संस्थेचे अध्यक्ष डॉ. संदीप मोरे यांनी दिली. सचिव डॉ. सचिन सोनवणे यांनी आभार मानले. यावेळी संघटनेच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक मुख्तार सय्यद यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी डॉ. दीपककुमार श्रीमाली, डॉ. चेतन क्षत्रिय, डॉ. योगेश पाटील, डॉ. विजयकुमार करवा, डॉ. शांताराम शिंदे, डॉ. राहुल मोरे, डॉ. सम्राट भार्गवे, डॉ. राजेंद्र कमानकर, डॉ. शरद केदार, डॉ. सोपान दिघे, डॉ. जीतेन क्षत्रिय, डॉ. बी. एस. आरोटे, डॉ. आर.आर. बोडके यांच्यासह शहरातील डॉक्टर्स उपस्थित होते. (वार्ताहर)
आयएमएच्या बंदला डॉक्टर्स असोसिएशनचा पाठिंबा
By admin | Published: March 24, 2017 11:27 PM