महेंद्र दातरंगे।पुण्यासारख्या शहरात एका नामांकित रुग्णालयात रुग्णाला बरे करण्यासाठी मांत्रिक बोलवला जातो आणि त्याचा उपयोग तर काही होत नाहीच, परंतु हलगर्जीपणामुळे महिला रुग्णाचा बळी जातो, ही पुरोगामी महाराष्टÑाला धक्का देणारी बाब आहे. केवळ पदवी घेतली म्हणजे ज्ञान येते असे नाही असेच यातून दिसून आले असून, आता अशाप्रकारांना टाळण्यासाठी वैद्यकीय व्यावसायिकांना अंधश्रद्धा विरोधातील प्रशिक्षण देण्याची गरज आहे. जो अज्ञानी आहे किंवा विज्ञानावर श्रद्धा नाही अशा एखाद्या व्यक्तीने आता आजाराच्या अगतिकतेपोटी एखाद्या बाबा-बुवाला बोलवणे हे चुकीचे असले तरी ते मान्य करण्यासारखे आहे. परंतु येथे विज्ञानाची पदवी घेऊन विज्ञानाला नाकारले जात असेल तर पदवी काय कामाची? असा प्रश्न निर्माण होतो. खरे तर वैद्यकीय पदवी हीच विज्ञाननिष्ठतेची पायरी आहे. परंतु अशावेळी एखादा डॉक्टर आपल्याकडून रुग्णाला बरे वाटणे शक्य नाही म्हणून अंधश्रद्धेच्या म्हणजेच अज्ञानाच्या आहारी जातो हेच धक्कादायक आहे. देशाने प्रगती केली. मोबाइल, इंटरनेट आणि संगणकाचे जाळे हे मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनले, परंतु तरीही एकविसाव्या शतकात राहणाऱ्या अनेकांची मानसिकता ही अकराव्या आणि बाराव्या शतकातील आहे, हेच दाखवणारी ही घटना आहे. त्यातल्या त्यात पुणेसारख्या शहरात जेथे महात्मा फुले यांनी पुरोगामित्व शिकवले आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचा वसा घेतला त्या ठिकाणी अशाप्रकारची घटना ही अधिक वेदनादायी आहे. पुणे हे विद्येचे माहेर घर मानले गेले. परंतु डॉ. दाभोलकर यांच्या घटनेचा तपास करणाºया उच्चपदस्थ पोलीस अधिकाºयांनी प्लॅँचेटचा प्रयोग करणे ही धक्कादायक बाब तसेच अलीकडेच पिंप्री- चिंचवड येथेही अंधश्रद्धेचा एक प्रकार घडला. त्यामुळे ‘पुणे आता विद्येचे माहेर आहे की अंधश्रद्धे’चे याचा विचार करण्याची वेळ आली आहे. सदरची घटना घडल्यानंतर आता रुग्णालयाने संबंधित फरार डॉक्टरला पकडण्यासाठी आणि त्याच्याकडील वैद्यकीय परवाना रद्द करण्यासाठी सहकार्य केले पाहिजे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे संबंधित डॉक्टरने आपल्याकडून रुग्ण बरा होत नसेल तर त्याला दुसºया तज्ज्ञ डॉक्टरकडे शिफारस करण्याऐवजी अंधश्रद्धेचा वापर केल्याने त्याच्यावर जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची गरज आहे, तर अशाप्रकारांना भविष्यात आळा बसू शकेल. एकंदरच नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर येथे यापूर्वी शासकीय आरोग्य केंद्रात अशाच प्रकारे मांत्रिकाला पाचारण करण्याचा प्रकार घडला होता. त्यापाठोपाठ अशाप्रकारच्या घटना घडत असल्याने इंडियन मेडिकल असोसिएशनने त्याची दखल घ्यायला हवी. त्याचप्रमाणे डॉक्टरांनीच अंधश्रद्धेपासून दूर ठेवावी यासाठी मोहीम राबविण्याची गरज असून, अशाप्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समिती सर्व प्रकारे सहकार्य करण्यास आणि प्रशिक्षण देण्यास तयार आहे.(लेखक महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नाशिक जिल्हा शाखेचे कार्यवाह आहेत.)
डॉक्टरांना अंधश्रद्धाविरोधी प्रशिक्षणाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 1:14 AM