नाशिक : इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे शुक्रवारी सकाळी डॉक्टरांवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ शहरातून मोर्चा काढल्यानंतर झालेल्या बैठकीत संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. नाशिक शाखेची सर्वसाधारण बैठक झाल्यानंतर महाराष्ट्र आयएमएच्या निर्देशानुसार आंदोलन रद्द करीत असल्याचे नाशिक शाखेचे अध्यक्ष अनिरुद्ध भांडारकर यांनी जाहीर केले. त्यामुळे आता शहरातील सर्व ओपीडी आणि इतर वैद्यकीय सेवा नियमितपणे सुरू होणार आहे. डॉक्टरांच्या आंदोलनामुळे सर्वसाधारण रुग्णांना झालेल्या गैरसोईबद्दल आयएमए सचिव प्रशांत देवरे यांनी दिलगिरी व्यक्त करतानाच डॉक्टरांवरील वाढत्या हल्ल्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व डॉक्टरांचे त्यांनी आभारही मानले आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेच्या पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचे स्पष्ट केल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी खासगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष सेल स्थापन करण्यासाठी सहमती दर्शवली. तसेच वैद्यकीय विद्यार्थ्यांशी संबंधित सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी आवश्यक खर्च तसेच हल्ल्यात जखमी विद्यार्थी डॉक्टर्सच्या उपचाराचा सर्व खर्च उचलण्यासह सरकार तयार झाले आहे. (प्रतिनिधी)शासकीय रुग्णालयांची रात्र सेवाआयएमएच्या नाशिक शाखेने सर्व वैद्यकीय सेवा बंद करून आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केल्यापासून शहरातील सर्व शासकीय रुग्णालयांतील डॉक्टरांनी दिवसरात्र सेवा दिली. त्यामुळे संपूर्ण शहरातील खासगी वैद्यकीय सेवा बंद असताना आरोग्य सेवांचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नसल्याने हे सरकारी डॉक्टरांच्या कर्तव्यनिष्ठेचे यश मानले जात आहे. आयएमएचा मोर्चा; ‘डॉक्टर वाचवा, पेशंट वाचवा’ची घोषणाबाजी डॉक्टरांवर वेगवेगळ्या कारणांनी होणाऱ्या हल्ल्यांविरोधात जिल्हाभरातील वैद्यकीय संघटनांनी डॉक्टरांच्या विविध मागण्यांसाठी व नाशिक शहरासह राज्यभरात डॉक्टरांना मारहाणीच्या घडलेल्या वेगवेगळ्या घटनांच्या निषेधार्थ आयएमएसह सर्व वैद्यकीय संघटनांनी शुक्रवारी (दि. २४) शहरातून मोर्चा काढून घोषणाबाजी केली. आयएमएच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मोर्चात डॉक्टर वाचवा, पेशंट वाचवा, डॉक्टरांना न्याय हवा, डॉक्टरांना सुरक्षा द्या, अशा मागण्या करीत बुधवारी रात्रीपासून संपावर गेलेल्या डॉक्टरांनी वैद्यकीय पोषाख करून डॉक्टरांवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ फलक झळकावले. शालिमार चौकातील आयएमए कार्यालयापासून मेनरोडमार्गे रविवार कारंजा, रेड क्रॉस सिग्नल व महात्मा गांधी रोड मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी डॉक्टरांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आले.
डॉक्टरांचा संप अखेर मागे
By admin | Published: March 25, 2017 12:03 AM