चांदवड : शासनाने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या विविध मागण्या मान्य कराव्यात यासाठी राज्यातील सरकारी रुग्णालयातील डॉक्टर मंगळवारपासून बेमुदत संपावर गेले असून, संपाच्या दुसऱ्या दिवशीही चांदवड तालुक्यात रुग्णांना शासकीय दवाखान्यात सेवा न मिळाल्याने रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. तर मानसेवी डॉक्टर सेवा देण्यासही कमी पडल्याचा अनुभव आला आहे. चांदवड उपजिल्हा रुग्णालयातील पाच वैद्यकीय अधिकारी संपावर असल्याने चांदवड तालुक्यातील रुग्णांची ससेहोलपट झाली तर चार मानसेवी डॉक्टर वैद्यकीय सेवा देत असले तरी एवढ्या मोठ्या रुग्णालयात रुग्णसंख्या अधिक असल्याने रुग्णांचे हाल झाले. चांदवड उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. सुशीलकुमार शिंदे, डॉ. मंडलिक, डॉ. नायक, डॉ. गायकवाड, डॉ. अहेर हे पाच डॉक्टर संपावर आहेत. तर मानसेवी डॉ. राहुल हजारे, डॉ. तुषार सूर्यवंशी, डॉ. द्विग्विजय पाटील, डॉ. सुवर्णा गुंजाळ हे चार डॉक्टर रुग्णांना सेवा देत होते. तरीही रुग्णांची वाढती संख्या बघता डॉक्टरांची सेवा अपूर्णच दिसत होती. मानसेवी डॉक्टर संघटनेचा पण आज उद्या संपावर जाण्याचा निर्णय असल्याचे मानसेवी डॉक्टरांनी सांगितले. मानसेवी डॉक्टरांनी संपात भाग घेतला नाही तर डॉक्टरांच्या मागण्या मान्य होणार नसल्याचे सांगण्यात आले. चांदवड तालुक्यात जिल्हा परिषदेअंतर्गत आरोग्य केंद्रावरील ९ वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी ७ वैद्यकीय अधिकारी संपात सहभागी आहेत. त्यातील दोन वैद्यकीय अधिकारी संपात सहभागी नसल्याचे सांगण्यात आले. पाचही आरोग्य केंद्रांवर बालस्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत चमूने अत्यावश्यक सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, या पाचही आरोग्य केंद्रांतील मिश्रकही शंभर टक्के संपावर असल्याने रुग्णांना सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी ग्रामीण भागातून होत आहे. चांदवड तालुक्यात पाच प्राथमिक आरोग्य केंदे्र असून, ११ वैद्यकीय अधिकारी पदे मंजूर आहेत. त्यापैकी उसवाड प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. हितेश महाले उच्च शिक्षणासाठी गेले असून, तळेगाव येथील डॉ. विनीता गुंटे या हजरच नाहीत, तर उर्वरित ९ पैकी ७ डॉक्टर संपावर आहेत. नांदगाव तालुक्यातही रुग्णांची गैरसोयन्यायडोंगरी : वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संपामुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी तातडीने जिल्हा शल्य चिकित्सकांनी तात्पुरती आपल्याकडील वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. मात्र संपाचा दुसरा दिवस असताना नांदगाव तालुक्यातील पाचही प्राथमिक आरोग्य केंद्रांत एकही अधिकारी हजर न झाल्याने रुग्णांना उपचाराविना माघारी फिरावे लागले. ग्रामीण भागात खासगी दवाखाने नसल्याने रुग्णांची अधिकच गैरसोय झाली.नांदगाव तालुक्यात एकूण पाच प्राथमिक आरोग्य केंदे्र असून न्यायडोंगरी, वेहळगाव, बोलठाण, हिसवळ, पिंपरखेड या गावांचा समावेश आहे. आमचे प्रतिनिधींनी या प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे फेरफटका मारला असता, नेहमीचे वैद्यकीय अधिकारी संपावर असून, ज्यांची तात्पुरती वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती त्यांनीही जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत कुठेही हजर नव्हते. त्यामुळे पाचही प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या परिसरातील रुग्णांचा आरोग्य सुविधा विस्कळीत झाली असल्याने त्यात प्रसूतीसारख्या रुग्णांची तर मोठी गैरसोय होत आहे. इतर कर्मचारी हजर आहेत; पण डॉक्टरांचा सल्ला उपचार करण्यासाठी गरजेचे असल्याचे डॉक्टरांची गरज भासत आहे.रुग्णांचे हाल होऊ नये या उद्देशाने जिल्हा परिषदेने जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या अंतर्गत असलेले वैद्यकीय अधिकाऱ्यांची तात्पुरती नेमणूक केली असून, हीदेखील नियुक्ती प्राथमिक आरोग्य केंद्रात हजर झाले नसल्याने त्याचा मोठा परिणाम आजही रुग्णांवर झाला. (वार्ताहर)
डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांचे हाल !
By admin | Published: July 03, 2014 9:57 PM