नाशिक : कोरोनाच्या आगमनापासून गत सव्वा वर्षापासून सातत्याने कामाचा आणि मानसिक ताण-तणाव, धावपळ आणि दररोजची दगदग वाढल्याने बहुतांश डॉक्टरांच्या वजनातही घट झाली आहे. यापूर्वीच्या काळात दररोज सकाळचा वॉक, जॉगिंग करूनही न घटणारे वजन सततच्या कामाच्या दबावाने घटल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
जिल्ह्यात मे महिन्याच्या मध्यापर्यंत कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत होते. मे महिन्याच्या उत्तरार्धात त्यात काही प्रमाणात घट आली असली तरी सततच्या ताणतणावाने डॉक्टरांनादेखील अशक्तपणा, वजनात घट, मनस्वास्थ्य नसणे अशा त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रुग्णालयांमध्ये वाढती रुग्णसंख्या, अपुरे कर्मचारी, आवश्यक बाबींची अनुपलब्धता, कामांच्या वेळांमध्ये होणारे सततचे बदल, तसेच कोरोना रुग्णांना हाताळताना आपल्याला काही होऊ नये, आपल्या कुटुंबाला काही बाधा होऊ नये याबाबत खबरदारी घेण्याचा तणाव सतत सव्वा वर्ष सहन करण्याचे परिणाम शरीरावर दिसू लागले आहेत.
इन्फोे
पुरेशा विश्रांतीचा अभाव
अनेक डॉक्टरांना तर कोविड बाधित झाल्यानंतरही पुरेशी विश्रांती घेता आलेली नाही. कुणाला कोरोनामुक्त झाल्यानंतर आठवडाभरात तर कुणाला अवघ्या दहा-बारा दिवसानंतर त्वरित कामावर रुजू व्हावे लागले. या सर्व बाबींचा परिणाम म्हणजे कितीही पौष्टीक, प्रथिनयुक्त अन्न घेतले तरी पुरेशी विश्रांती होत नसल्याने अनेकांच्या वजनात किमान पाच ते दहा किलोपर्यंत घट झाली आहे.
इन्फो
शास्त्रशुद्ध आहारानंतरही नाही वजनात वाढ
सकाळी तणावमुक्तीसाठी दररोज योगासने, सोसायटीच्या गार्डनमध्ये किंवा बंगल्याच्या गार्डनमध्ये वॉक, त्यानंतर फळांचे ज्यूस, पौष्टीक नाश्ता, दुपारचे जेवण, सायंकाळी चहा किंवा ज्यूस तसेच रात्रीचे जेवण थोडे कमी असा शास्त्रशुद्ध आहार घेऊनही सततच्या काम आणि तणावांमुळे वजनात वाढ होत नसल्याचेही अनेक डॉक्टरांचे म्हणणे आहे.
कोट
गत दीड वर्षापासून सुरू असलेल्या कोरोनाच्या वाढत्या विस्फोटामुळे कामाचे कोणतेच वेळापत्रक उरलेले नाही. सततच्या व्यस्त कामकाजामुळे माझ्या वजनातदेखील ७ किलोने घट आली असून बहुतांश डॉक्टरांचीदेखील कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती आहे.
- डॉ. हेमंत पाटील