नांदूरशिंगोटे (सचिन सांगळे) : सिन्नर तालुक्यातील राजकीय दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या दोडी बुद्रूक येथे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये तेरापैकी ११ जागा जिंकून परिवर्तन पॅनलने निर्विवाद बहुमत मिळविले. आरक्षण सोडतीमध्ये सरपंचपद हे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. अनुसूचित जाती गटातून परिवर्तनच्या ज्योती नितीन भालेराव या एकमेव उमेदवार विजयी झाल्याने सरपंचपदी त्यांची वर्णी लागणार आहे. परिसरातील सर्वांत मोठे गाव म्हणून दोडी गावाचा नावलौकीक असून, सरपंचपद हे सर्वसाधारण होईल व आपण सरपंच होऊ असे नवनिर्वाचित सदस्यांना वाटत असताना अनपेक्षितपणे सरपंचपद हे अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे.
तालुक्यातील दोडी बुद्रूक येथील ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक अटीतटीची होऊन माजी आमदार राजाभाऊ वाजे समर्थक ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पांडूरंग केदार, उपाध्यक्ष राजाराम आव्हाड व जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार यांच्या परिवर्तन पॅनलने ११ जागा पटकावल्या होत्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ व माजी सरपंच पी. जी. आव्हाड यांच्या नम्रता पॅनला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले होते. ग्रामपंचायतीच्या तेरा जागांपैकी एक जागा अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव होती. परिवर्तन पॅनलकडून ज्योती भालेराव, तर नम्रता पॅनलकडून वर्षा भालेराव यांच्यात समोरासमोर लढत होत ज्योती भालेराव यांनी विजय मिळवला होता. आरक्षण सोडतीत सरपंचपद हे राखीव झाल्याने उपसरपंच पदासाठी रस्सीखेच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
-------------
प्रथमच सरपंचपदाचा मान
सिन्नर तालुक्यातील दोडी हे गाव नेहमीच राजकीय क्षेत्रात चर्चेत असते. दोडीतील नेत्यांना जिल्हा व तालुकास्तरावर काम करण्याची संधी मिळाली आहे. येथील स्थानिक पातळीवरील निवडणुका नेहमीच चुरशीच्या होतात. त्यामुळे संपूर्ण तालुक्याचे लक्ष असते. ग्रामपंचायत स्थापन झाल्यानंतर प्रथमच सरपंचपदाचे आरक्षण अनुसूचित जातीसाठी राखीव निघल्याने त्या समाजाला प्रथमच सरपंच होण्याचा बहुमान मिळणार आहे. भालेराव या एकमेव सदस्य असल्याने त्यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. भालेराव या शिक्षित असून, आगामी काळात त्यांना गावच्या विकासासाठी योगदान देण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. (०६ ज्योती भालेराव)
===Photopath===
060221\06nsk_5_06022021_13.jpg
===Caption===
०६ ज्योती भालेराव