लोहोणेर : आदिवासी बांधवाचा मार्गशीर्ष महिन्यात अतिव श्रद्धेने साजरा होत असलेला डोगऱ्या देव उत्सवास लोहोणेर व विठेवाडी येथे सुरवात झाली आहे.
सध्या कसमादे पट्ट्या सह सर्वत्र जोरदार थंडीची लाट आहे. आदिवासी बांधवांचा डोंगऱ्या देव उत्सव ऐन थंडीत मार्गशीर्ष महिन्यात साजरा केला जात असतो. सदर उत्सव काळात अत्यंत कडक नियम या आदिवासी बांधवा कडून पाळले जातात. पायात चप्पल न घालता पहाटे गार पाण्याने आंघोळ करणे, गाव मागणे, उत्सवाच्या काळात तिखट- मीठ वर्ज्य करणे, रात्री जागर करणे, असे कडक नित्य नियम या उत्सवाच्या दरम्यान पाळण्यात येत असतात.
पाच गांव फेरीत ग्रामदेवता भेटी गाव मागणे आदी सोपस्कार पार पाडले जातात.डोंगऱ्या देवाची व आदिवासी समाज हिताची गाणे म्हणत फेर धरून नाचणे हे हया उत्सवाचे खास वैशिष्ट्य आहे. लोहोणेर व विठेवाडी येथील आदिवासी वस्तीत हया उत्सवास नुकतीच सुरवात झाली असून देव भेटी नंतर गाव फेरीतून जमलेला सिधा एकत्र करून पौर्णिमेला महाप्रसाद ( भंडारा ) ने हया उत्सवाची सांगता होत असते.