दिंडोरी : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी दिंडोरी तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी धनंजय निकम, तहसीलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी दिली . जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वित्रक निवडणुकीसाठी दि. २१ फेब्रुवारीला मतदान होत असून, दिंडोरी तालुक्यात जिल्हा परिषद ६ गट व पंचायत समितीचे १२ गण असून तालुक्यात एकूण २०८ बूथवर मतदान होणार आहे. त्यात २३० केंद्राध्यक्ष, (२२ राखीव), राखीवसह २३० पथकाचे एकूण ९२० मतदान अधिकारी, प्रत्येक बूथवर एक शिपाई असे २३० शिपाई कर्मचारी व प्रत्येक केंद्रावर पोलीस कर्मचारी व यांच्यावर नियंत्रण व मदत करण्यासाठी २४ झोनल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून निवडणुकीची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. या सर्व केंद्रअध्यक्ष, मतदान अधिकारी यांना आज औधोगिक प्रशिक्षण संस्था ( आय.टी.आय.) उमराळे रोड दिंडोरी येथे निवडणुकीचे साहित्य वाटप करून नेमणूक केलेल्या केंद्राच्या ठिकाणी वाहनाद्वारे पोहचिवण्यात येणार आहे. यासाठी शासनाच्या २७ बस, १६ खाजगी जीप,असणार आहे. निवडणुकीच्या दिवशी २४ झोनल अधिकारी आपल्या नेमून दिलेल्या बीटात नियंत्रण व मदत करणार आहे निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी धनंजय निकम , सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार बाबासाहेब गाढवे, पोलीस निरीक्षक मधुकर गावीत, नायब तहसीलदार धनंजय लचके,प्रज्ञा टाकळे, बी. डी. महात्मे, आदींसह महसूल चे सर्व कर्मचारी प्रयत्नशील आहेत. (वार्ताहर)
दिंडोरीत प्रशासकीय तयारी पूर्ण
By admin | Published: February 20, 2017 12:50 AM