नाशिक : औरंगाबाद येथील एका शेतकऱ्याकडे बदनामीचे वृत्त देण्याची भीती दाखवून सुमारे दोन कोटींची खंडणी वसूलीचा प्रयत्न करणा-या डोंबिवलीच्या एका यु-ट्यूब चॅनलच्या तोतया पत्रकारास नाशिकच्या म्हसरूळ पोलिसांनी सापळा रचून सोमवारी (दि.७) बेड्या ठोकल्या.वैजापूर तालुक्यातील सावरखेड गावातील रहिवाशी असलेले शेतकरी बाबासाहेब लक्ष्मण थेटे (५५) हे एका भक्त मंडळाशी जोडलेले आहेत. त्यांच्या देवस्थानविषयी चुकीच्या पध्दतीने बातम्या देण्याची भीती दाखवत संशयित तोतया पत्रकार विनायक पांडुरंग कांगणे (रा. डोंबिवली, कल्याण) याने तब्बल २ कोटी रूपयांची खंडणीची मागणी केली. तडजोडअंती सव्वा कोटी रूपयांची खंडणी देण्यासाठी विनायकने थेटे यांच्यावर दबाव टाकला. त्याने वैजापूर तालुक्यात सावरखेड गावात येण्यास नकार दिला तसेच तक्रारदारानेही डोंबिवलीला येण्यास नकार दर्शविल्याने दोघांच्या सोयीचे म्हणून नाशिक शहरात ‘डील’ करण्याचे ठरले. दरम्यान, थेटे यांनी सायंकाळी म्हसरूळ पोलीस ठाणे गाठून वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय सांगळे यांची भेट घेत सगळा प्रकार कथन केला. यानंतर सांगळे यांनी उपनिरिक्षक संजय पवार, हवालदार सुरेश माळोदे, मंगेश दराडे, उत्तम पवार आदिंना बोलावून घेत थेटे यांच्याकडील १ लाख रूपयांच्या ख-या नोटांच्या अधारे उर्वरित सव्वा कोटी रूपयांची रोकड बनावट नोटांच्या बंडलद्वारे तयार क रत सापळा रचण्यास सुरूवात केली. कांगणे याने तक्रारदार थेटे यांना प्रथम म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत पेठरोडवरील एका हॉटेलमध्ये बोलाविले. त्यानंतर काही मिनिटांतच त्याने भेटण्याचे ठिकाण बदलत थेट नाशिकरोडच्या एका अपार्टमेंटचे नाव सांगितले. येथील एका रिध्दी सिध्दी नावाच्या अपार्टमेंटजवळ पोलिसांनी थेटे यांना पोहचविले. पोलिसांनी मात्र त्यांच्यावर नजर ठेवून थेटे सदनिकेत जाताच काही वेळेत पथकानेही दरवाजा ठोठावून प्रवेश करत संशयित कांगणे यास १ लाख रूपयांच्या अस्सल नोटा तर उर्वरित बनावट नोटा घेताना रंगेहाथ ताब्यात घेतले. त्याच्याविरूध्द पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला.
डोंबिवलीच्या तोतया पत्रकारास सव्वा कोटींची खंडणी घेताना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2019 10:22 PM
पोलिसांनी मात्र त्यांच्यावर नजर ठेवून थेटे सदनिकेत जाताच काही वेळेत पथकानेही दरवाजा ठोठावून प्रवेश करत संशयित कांगणे यास १ लाख रूपयांच्या अस्सल नोटा तर उर्वरित बनावट नोटा घेताना रंगेहाथ ताब्यात घेतले.
ठळक मुद्दे१ लाख रूपयांच्या अस्सल तर उर्वरित बनावट नोटा घेताना रंगेहाथ ताब्यात तडजोडअंती सव्वा कोटी रूपयांची खंडणी देण्यासाठी दबाव