केंद्र शासनाकडून स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची दरवाढ करण्यात आली आहे. मात्र गेल्या दहा महिन्यापासून गॅसच्या सबसिडीचा एक रुपयाही सिलिंडरधारकांच्या खात्यावर जमा झाला नाही. यामुळे ग्रामीण भागातील जनतेला मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. अगोदरच कोरोनाच्या स्थितीमुळे शहरी व ग्रामीण भागातील जनता आर्थिक संकटांचा सामना करीत आहे. गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत दीडशे ते दोनशे रुपयांच्या आसपास सिलिंडरचे भाव वाढले आहेत. त्यामुळे अवघ्या काही दिवसात गॅस सिलिंडर आठशे रुपयांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. गॅसची भाववाढ सातत्याने होत असल्याने परिणामी सामान्य नागरिकांचे या भाववाढीमुळे कंबरडे मोडले गेले आहे. शहरी व ग्रामीण भागातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असताना पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्याने सर्वसामान्य नागरिकांना जगण्याचा प्रश्न पडला आहे. त्यातच घरगुती वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता तसेच शेतकरी यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे.
इन्फो
उज्जवला लाभर्थ्यांची अडचण
केंद्र शासनाने उज्ज्वला गॅस योजना राबवून गरिबांना मोफत गॅस दिला गेला होता. आता त्यांनाही महागड्या किमतीचा गॅस विकत घ्यावा लागत आहे. गॅस सिलिंडरच्या दरवाढीमुळे पुन्हा सरपणाची आवश्यकता भासते की काय, अशी स्थिती ग्रामीण भागात निर्माण झाली आहे.