नाशिक : कोविड-१९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रक्त संकलनामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. परिणामी आधीच असलेला रक्ताचा तुटवडा मार्च महिन्यापासून अधिक भासण्याची चिन्हे आहेत. त्यात लस घेणाऱ्यांना पहिल्या लसीनंतर सुमारे दोन महिने रक्तदान करता येणार नसल्याने तसेच बहुतांश रक्तदाते हेच यापुढील काळात लस घेणार असल्याने आता लस घेण्यापूर्वीच रक्तदान करून घेण्याचे आवाहन प्रशासन तसेच रक्तपेढ्यांच्यावतीने करण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिक आणि कोमॉर्बिड रुग्णांना लसीकरणास प्रारंभ झाला आहे. त्याचबरोबर आता जनसंपर्क अधिक असणाऱ्या व्यक्तींच्या लसीकरणासदेखील प्रारंभ होणार आहे. प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिक घरातून बाहेर पडत नाहीत. परिणामी रक्तदानात अधिकच घट झाली आहे. त्यात नियमित रक्तदाते असलेल्या नागरिकांनीदेखील लस घेतली तर त्यांना पहिल्या लसीनंतर किमान दोन महिने म्हणजेच दुसऱ्या डाेसनंतर एक महिना रक्तदान करता येणार नसल्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे भविष्यात रक्ताचा मोठा तुटवडा भासण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नियमित रक्तदात्यांनी तसेच रक्त देण्यास इच्छुक असलेल्या नागरिकांनी लसीकरणापूर्वीच रक्तदान केल्यास हा तुटवडा काही प्रमाणात तरी कमी होऊ शकेल. एप्रिल ते जून आणि ऑक्टोबर ते नोव्हेंबर या काळात नेहमीच रक्ताचा तुटवडा जाणवतो. दरवर्षी स्वैच्छिक रक्तदान समितीच्या माध्यमातून रक्तदान शिबिरांचे आयोजन करून रक्त तुटवड्यावर मात केली जाते. मात्र, यंदा उन्हाळ्यात तर ही समस्या अधिकच बिकट ठरणार असल्याने वेळीच उपाययाेजना आवश्यक आहेत.
इन्फो
रक्तदानाचे वास्तव
एप्रिल, जून, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये साधारणत: रक्ताचा तुटवडा असतो. त्यात यंदा कोरोनाची भर पडली. त्यामुळे रक्तदान शिबिरांचे प्रमाणही कमी झाले आहे. नागरिकही घरातून बाहेर पडत नसल्याने रक्तदानाच्या प्रमाणात घट झाली आहे. अशा परिस्थिती नियमित रक्तदात्या नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यासच पुढील काळात गरजू रुग्णांचे जीव वाचविणे शक्य होणार आहे.
इन्फो
जिल्ह्यात १६ रक्त संकलन केंद्रे
राज्यात ३३२ परवानाधारक रक्तपेढ्या कार्यरत असून जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषाप्रमाणे लोकसंख्येच्या एक टक्का रक्त संकलन असणे आवश्यक आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी ८ लाख असून लोकसंख्येच्या प्रमाणात १२ लाख रक्त पिशव्यांचे संकलन आवश्यक असते. तर नाशिक जिल्ह्याची लोकसंख्या ७२ लाखांच्या आसपास असल्याने किमान ७० हजार रक्तपिशव्या दरवर्षी आवश्यक असतात. राज्यात रक्तपेढ्यांच्या संख्येत नाशिक जिल्हा पाचव्या स्थानावर असून नाशिक एकूण १६ रक्तपेढ्या आहेत. स्वैच्छिक रक्तदानामार्फत मिळालेले हे रक्त अशक्त माता, बालके, अपघातग्रस्त रुग्ण, कर्करुग्ण, थॅलेसिमिया, हिमोफिलिया, सिकलसेल व रक्ताच्या अन्य आजारांसाठी वापरले जाते.
कोट
रक्त संकलनाचे प्रमाण कोरोना काळात खूपच घटले आहे. त्यात दरवर्षी उन्हाळ्यात ते प्रमाण अधिकच घटत असते. तसेच नवीन लस घेणाऱ्यांना त्वरित रक्तदान करता येणार नसल्याने नियमित रक्तदात्यांनी लस घेण्यापूर्वी काही दिवस अगोदर रक्तदान करून घेतल्यास रक्तसाठा काही प्रमाणात तरी उपलब्ध राहू शकेल.
विनय शौचे, सीईओ, जनकल्याण रक्तपेढी