नाशिक : शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व गणेशभक्तांनी मूर्तिदान व निर्माल्य संकलन करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत एकूण दोन लाख ६२ हजार १९२ विसर्जित गणेशमूर्तींचे दान केले आहे. याशिवाय नदीपात्रात निर्माल्य आणि प्लॅस्टिक पिशव्या टाकण्याऐवजी त्या संकलित करण्याच्या अभियानालाही प्रतिसाद मिळाला असून, १२० टन इतके निर्माल्य महापालिकेने जमा केले आहे.गणेश विसर्जन करताना गोदापात्र तसेच अन्य नद्यांमध्ये प्रदूषण होऊ नये, यासाठी महापालिका तसेच विविध सेवाभावी संस्थांच्या वतीने विसर्जित गणेशमूर्ती दान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. महापालिकेने ठरवून दिलेली अधिकृत विसर्जनस्थळे तसेच कृत्रिम तलावांच्या ठिकाणी विसर्जित गणेशमूर्ती दान स्वीकारण्याची व्यवस्था केली होती. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, विविध सामाजिक संस्था, विविध शाळा आणि अन्य सेवाभावी संस्थांच्या वतीनेदेखील मूर्तिदानाबाबत व्यवस्था करण्यात आली होती. गणेश विसर्जनासाठी नदीपात्रात तीन वेळा मूर्ती बुडवून नंतर ती या संस्थेच्या प्रतिनिधींना देण्यात आली. एकूण दोन लाख ६२ हजार १९२ मूर्तींचे संकलन करण्यात आले.मूर्तींप्रमाणेच निर्माल्य नदीपात्रात जाऊ नये यासाठीदेखील दक्षता घेण्यात येत होती. निर्माल्य कलश आणि घंटागाड्यांची यासाठी सोय करण्यात आली होती. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी महापालिका आणि सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी विसर्जनाच्या आधीच मूर्तीवरील हार-फुले आणि अन्य साहित्य काढून घेण्यास सांगत होते. (प्रतिनिधी)
नागरिकांनी केल्या दोन लाख ६२ हजार गणेशमूर्ती दान
By admin | Published: September 10, 2014 9:34 PM