सायखेडा : माणूस होण्यासाठी आणि माणूस घडविण्यासाठी परिस्थितीची तमा बाळगू नका. दहशतवादी संघटनांकडून माझे एकोणीसवेळा अपहरण झाले, काश्मीर प्रांतात मानवतावादी काम करू नये असा अनेक वेळा सरकारने फतवा काढला, तरीही न घाबरता काम सुरूच ठेवले आहे. आता तर अधिक जोमाने काम सुरू असल्याचे प्रतिपादन बॉर्डर लेस संघटनेचे संचालक अधिक कदम यांनी केले.कदम यांनी शिंगवे येथे नागरिक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी यावेळी व्यासपीठावर जितेंद्र भावे, सरपंच शिवाजी माने, उपसरपंच धोंडीराम रायते उपस्थित होते. कदम यांनी सांगितले, देशाच्या सीमेवर कार्य करणाऱ्या सैनिक यांचीच संरक्षणाची जबाबदारी नाही तर भारताचा नागरिक म्हणून आपण देखील सीमेवरील लोकांचे सामाजिक स्थान उंचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. सीमेवर सामान्य माणसाला अजूनही मूलभूत सुविधा निर्माण झाल्या नाही. त्यांच्यात माणूसपण आणण्यासाठी अहोरात्र काम करण्याची गरज असल्याचे माझ्या लक्षात आले आणि तेथून कामाला सुरुवात झाली. आज ज्या ठिकाणी दहा माणसे एकत्र येऊ शकत नाही अशा ठिकाणी १५० मुलांचे आणि ३०० मुलींचे वसतिगृह सुरु केले आहे. त्यांना आरोग्य, शिक्षण ,महिला सबलीकरणाचे धडे दिले जात आहे. शिंगवे गावाने आदर्श गाव म्हणून पुढे यावे. यासाठी माणसांनी त्याग करावा असा सल्लाही त्यांनी दिला. यावेळी विकास भागवत, सुदाम खालकर, योगेश रायते , दीपक कदम , भूषण शिंदे, संजय भागवत, गणेश वाणी, अशोक डमाळे, शशी डमाळे, जावेद शेख, विठ्ठल उगले,राजाराम मुंगसे, वाळू जाधव, बापू ढिकले , मनोज ठाकरे, राहुल पडोळ, राहुल कोटकर आदी उपस्थित होते