नाशिक : पावसाळा दरवर्षी येतो आणि त्याबरोबर गोदावरीसह अन्य नद्यांना पूरदेखील नित्यनेमाने येतो. पाऊस आणि पूर यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या दरवर्षीच उग्र रूप धारण करतात. कधी कधी तर ते जिवावर बेतते. मग पुन्हा मागणी सत्र, उपाययोजनांचे प्रस्ताव आणि मंजुरीचे कागदी घोडे नाचवले जातात. परंतु एकदा हा हंगाम गेला की पुन्हा सारेच निर्धास्त होतात. जणू पुढील पावसाळ्याची प्रतीक्षाच सारे करतात. पडके वाडे, नदीपात्रालगत शिरणारे पाणी, खंडित होणारा विविध भागातील संपर्क हे सारे प्रश्न यंदाही आवासून उभे आहेत. गेल्या वर्षीच्या चर्चेनंतर त्यातील एकही प्रश्न अद्याप सुटलेला नाही.गोदावरी नदीकाठी नाशिक शहर वसले असल्याने पुराचा धोका या शहराला कायमच होता. मात्र, शहर वाढत गेले आणि नदीपात्र संकुचित होत गेले. इतकेच नव्हे तर शहरातील वाघाडी, नासर्डी (नंदिनी) आणि वालदेवी या तीन नद्यांची अवस्थादेखील गोदावरी इतकीच दयनीय होत गेली. मग पावसाळा आला की पुराची भीती मनात दाटून येते. नाशिकमध्ये फार काही घडणार नाही, असे सर्व अंदाज चुकवत २००८ मध्ये शहरातील सर्वच नद्यांना महापूर आला. शहरात यापूर्वी १९६९ मध्ये महापूर आला होता आणि त्याच्याच आठवणी जुन्या पिढीच्या स्मरणात होत्या. मात्र, निसर्गाला बाधक ठरणाºया चुका वाढत गेल्यानंतर २००८ मध्ये महापुराने त्याचा धडा दिला. निसर्गाने धडा दिला तरी नागरिक आणि यंत्रणांनी बोध मात्र घेतला नाही.नदीपात्रातील घरांना नोटिसा देणे, धोकादायक घर उतरवून घेण्याच्या नोटिसा देणे आणि पूर आल्यानंतर उपाययोजना या पलीकडे महापालिका कधी गेलीच नाही. अगदी २००८ च्या पुरानंतरदेखील महापालिकेने पूररेषेची तीव्रता कमी करण्यासाठी एका शासकीय संस्थेच्या माध्यमातून सल्ला घेतला. मात्र त्यातील एकही सल्ला आजपर्यंत अमलात आलेला नाही. महापालिकेच्या महासभेत पावसाळ्याच्या दरम्यान जोरदार चर्चा झडतात. सूचनांचा वर्षाव होतो, परंतु त्याचा नंतर काहीच पाठपुरावा केला जात नाही.यंदा पावसाळा तोंडावर आला आहे. दोन महिन्यांपासून कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने महापालिकेत चर्चा झालेली नाही. प्रशासनाने आपल्या पातळीवर कामे केली असली तरी ही प्रशासकीय राजवटच असून, त्याची व्याप्ती आणि उपयुक्तता हेच सर्वच प्रश्न कालांतराने निर्माण होऊ शकतात. आता फक्त पावसाळ्यात काहीही घटना दुर्घटना घडली तर कोरोना आणि लॉकडाउनचे निमित्त मिळेल, इतकेच! बाकी दरवर्षीच्या समस्यांपासून नाशिककरांची सुटका नाहीच. (क्रमश:-----------------------सर्व समस्या ‘जैसे थे’ंनाशिक शहरात ९ सप्टेंबर १९६९ मध्ये महापूर आला होता. त्यावेळी सरकारवाड्याच्या काही पायºया बुडाल्या होत्या, असे सांगण्यात येते. त्यानंतर १९ सप्टेंबर २००८ मध्ये आलेल्या पुरातदेखील त्याची पुनरावृत्ती झाली. गेल्याच वर्षी १९६९च्या महापुराला पन्नास वर्षे पूर्ण झाली तर आता २००८ च्या महापुराची सप्टेंबर महिन्यात तपपूर्ती होणार आहे. मात्र, यानंतरदेखील फार काही गांभीर्याने प्रश्न सोडवले गेलेले नाही. उलट सर्व समस्या जैसे थे आहेत.