नाशिक :- शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.म्हणून सरकार आणि जिल्हा प्रशासन लॉकडाऊनच्या विचारात आहे.परंतु लॉकडाऊनचा निर्णय घेण्यापूर्वी गोरगरीब जनतेचा प्रथम विचार केला पाहिजे. कारण परिणाम केवळ गोरगरिबांवरच होत असतो. हे मागील लॉकडाऊनमध्ये अनुभवले आहे.आताही निर्णय घेतला तर गोरगरीब लोकांवर उपासमारीची वेळ येणार आहे.टोकाची भूमिका घेण्याऐवजी कडक नियम करण्यास हरकत नाही. नवीन निर्बंध लादण्याऐवजी आहे, त्याच निर्बंधाची काटेकोर अंमलबजावणी केली तरी पुरे आहेत, अशा भावना शहरातील विक्रेत्यांनी व्यक्त केल्या आणि पुन्हा लॉकडाऊन करण्याच्या भूमिकांना विरोध दर्शवला आहेे. सध्या कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून त्यामुळे पुन्हा लॉकडाऊनच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. गेल्या वर्षी कोरोनाचे संकट आकस्मिक असल्याने लॉकडाऊन करण्यात आले. त्याचा सर्वाधिक फटका लहान व्यापारी, विक्रेते आणि कारगिर अशा वर्गाला अधिक बसला. त्यामुळे आता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन नको अशा प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.
.... मागील लॉकडाऊन अनुभवलेला आहे.अतिशय कठीण परिस्थितीतून जावे लागले होते. किरकोळ विक्रेत्यांना लॉकडाऊनच्या संकटाला सामोरे जावे लागले होते.त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन नको. रुग्ण वाढत आहेत.म्हणून टोकाची भूमिका घेऊ नये.
- पोपटराव जाधव.व्यवसायिक सातपूर.
.....
पुन्हा एकदा लॉकडाऊनची चर्चा सुरु झाल्याने भीती वाटायला लागली आहे.मागील लॉकडाऊनमध्ये आमच्या सारख्या छोट्या व्यासायिकांवर उपासमारीची वेळ आली होती.त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन झाल्यास पूर्वीसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते.म्हणून लॉकडाऊनचा पुनर्विचार केला पाहिजे.
- हरिदास शेलार, फळविक्रेता, सातपूर.
.....
यापूर्वीचा अनुभव पाहता पुन्हा लॉकडाऊन केल्याने त्याचे परिणाम काय होतील.याची भीती वाटत आहे.पुन्हा लॉकडाऊन झाल्यास सर्वसामान्य गरीब लोकांवर उपासमारीची वेळ येऊ शकते.त्यामुळे कोरोना रुग्ण वाढू नयेत म्हणून सर्वांनी नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे.
- राजू मुर्तडक, विक्रेता सातपूर.
....
कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच असल्याने शासन देखील लॉकडाउनचा विचार करीत आहे.परंतु सर्वसामान्य गरीब लोकांचे काय हाल होतील याचा विचार होणे गरजेचे आहे.मागील लॉकडाउनमध्ये झालेले हाल शासनाने पाहिलेले आहेत.तसे हाल पुन्हा होऊ नयेत.एवढीच अपेक्षा आहे.
- पराग कुलकर्णी.व्यवसायिक सातपूर.
------------
छायाचित्र आर फोटोवर नावाने