नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर लसीकरण अत्यंत महत्त्वाचे झाले असल्याचे सामान्य जनतेच्याही लक्षात आले आहे. त्यामुळे लसीकरणासाठी प्रचंड झुंबड उडाली असून प्रत्येक वयोगट आम्हालाच अग्रक्रमाने लस द्या, असे म्हणत आहे. अशा परिस्थितीत काही ६० आणि ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणासाठी निर्धारित वेळेपेक्षा एक-दोन आठवडे विलंब होत आहे. मात्र, असा विलंब होत असला तरी नागरिकांनी घाबरून न जाता उपलब्ध होईल, तेव्हा दुसरा डोस घेण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.
जगभरात जिथे लसीकरण वेगाने झाले तिथे कोरोनाला आळा बसत आहे. भारतातही १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. 'कोविशिल्ड' आणि 'कोव्हॅक्सिन' लस वापरून देशात लसीकरण सुरू आहे. त्यातही कधी ही लस तर कधी ती लस येते. त्यात कधी ज्येष्ठांना प्राधान्य तर कधी दुसऱ्या डोसवाल्यांना प्राधान्य असे निकषदेखील बदलत आहेत. त्यात आता १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीकरण देण्यास प्रारंभ झाल्याने तर लसीकरणाची समस्या अधिकच बिकट झाली आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना दुसऱ्या डोससाठी एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी लागत आहे.
इन्फो
लसीकरणासाठी झुंबड नको
पहिली लस मिळालेल्या लोकांचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. अनेकांना पहिला डोस मिळून महिना उलटत आला तरी दुसरा डोस मिळालेला नाही. दुसऱ्या डोसला उशीर झाला तर त्याचा प्रकृतीवर काही परिणाम होईल का? काही अडचण येईल काय? याबद्दल अनेक संभ्रम नागरिकांमध्ये दिसून येत आहेत. मात्र, नागरिकांनी संभ्रमित होऊन दुसऱ्या डोससाठी लसीकरण केंद्रांवर झुंबड करण्याची आवश्यकता नाही. झुंबड केल्यामुळे कोरोनाची बाधा होऊ शकते, याचे भान ठेवावे, असेच तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
दुसरा डोस थोडा पुढे चालतो
वैद्यकीय तज्ज्ञांनुसार दोन्ही लसींचे दोन्ही डोस महत्त्वाचे आहेत. दोन्ही लसींची म्हणजे कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्डचे परिणाम प्रभावी ठरत आहेत. त्यामुळे जी लस उपलब्ध आहे त्या लसीचा पहिला डोस नागरिकांनी घ्यावा. मात्र, पहिला डोस ज्या लसीचा घेतला असेल त्याच लसीचा दुसरा डोस घेणे आवश्यक आहे. लसीच्या दुसऱ्या डोसचा कालावधी ४ ते ६ आठवडे आहे. त्यातही एखादा आठवडा पुढे-मागे झाले तरी चालू शकते, त्या कालावधीत दुसरा डोस घेतल्यास शरीरात अँटिबॉडीज तयार होऊन नागरिक कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यास सक्षम बनू शकतील, असेही तज्ज्ञांचे मत आहे.
-------------------
(ही डमी आहे. )