नाशिक : दहावी-बारावीच्या परीक्षा तोंडावर असताना परीक्षा केंद्र निश्चित करण्यासह आवश्यक सोयी-सुविधा व प्रतिबंधात्मक उपाययोजना उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक विभागीय मंडळाकडून तयारी सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून विभागात तणावमुक्त वातावरणात परीक्षा घेण्यासाठी नाशिक विभागीय मंडळाकडून दहावी-बारावी परीक्षा तणावमुक्त होण्यासाठी हेल्पलाईन नंबर जाहीर करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे जिल्हानिहाय समुपदेशकही नियुक्त करण्यात आले आहेत. यावर्षी नाशिक विभागीय मंडळाकडून दहावीची परीक्षा ४५० केंद्रांवर , तर बारावीची परीक्षा २५० केंद्रांवर घेण्याची तयारी करण्यात येत आहे. मात्र, राज्य शिक्षणमंत्र्यांकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘शाळा तेथे केंद्र’ या पद्धतीने परीक्षा घेण्याचे नियोजन असल्याचे स्पष्ट केल्याने विभागीय मंडळावर परीक्षा केंद्रांचे पुनर्नियोजन करण्याची वेळ येण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे.
हेल्पलाईन
दहावीसाठी लॅंडलाईन - ०५३-२९५०४१०
दहावीसाठी मोबाईल -९४२३१८४१४१
बारावीसाठी लॅंडलाईन -०२५३-२९४५२४१ / ०२५३-२९४५२५१
बारावीसाठी मोबाईल - ९४२३१८४१४१
किती विद्यार्थी देणार परीक्षा
बारावी -१ लाख ६८ हजार
दहावी - २ लाख १०२८
मार्गदर्शनासाठी समुपदेशक
- दहावी-बारावी परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना काही तणाव असेल किंवा अडचणी असतील, तर या हेतुने तणावमुक्त परीक्षेसाठी मंडळाने समुपदेशकांच्या नेमणुका केल्या आहेत.
- परीक्षेबद्दल अनेक विद्यार्थ्यांच्या मनात भीती असते, संभ्रम असतो. अशी भीती विसरून विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात कोणत्याही दडपणाशिवाय परीक्षा द्यावी यासाठी समुपदेशक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे.
तणावमुक्त राहा, यशस्वी व्हा
दहावी व बारावीची परीक्षा कॉपीमुक्त व शांततेत पार पडाव्यात, तसेच विद्यार्थ्यांना अभ्यास व परीक्षांविषयी मार्गदर्शन मिळावे, यासाठी बारावी व दहावीच्या परीक्षेसाठी बोर्डाच्या वतीने समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. बोर्डाचे समुपदेशक विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेच्या दडपणामुळे निर्माण होणार तणाव दूर करून परीक्षेची भीती विद्यार्थ्यांच्या मनातून काढून टाकण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळे परीक्षेविषयी मनात कोणतीही भीती अथवा संभ्रम असल्यास विद्यार्थ्यांनी विभागीय मंडळाने नियुक्त केलेल्या समुपदेशकांना संपर्क साधण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.