नाशिक : ना नोकरीची हमी ना टीईटी वा सीईटीचे निश्चित वेळापत्रक यासह विविध कारणांमुळे विद्यार्थ्यांनी डीएड (डीटीएड) अभ्यासक्रमाकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यात २४ डीएड महाविद्यालये होती. त्यापैकी आजघडीला २१ डीएड महाविद्यालये सुरू असली तरी १६ ते १७ महाविद्यालयांमध्ये डीएड अभ्यासक्रमाला विद्यार्थ्याचा कल दिसून येत आहे.
नाशिक जिल्ह्यातील २४ डीएड महाविद्यालयामध्ये जवळपास १२५० हून अधिक जागा आहेत. या जागाकरिता सुमारे ७५० विद्यार्थ्यांचेच अर्ज ऑनलाईन प्राप्त झाले आहेत. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून राज्यभर शिक्षणशास्त्र पदविका अभ्यासक्रम चालविला जातो. या अभ्यासक्रमाला आधी डीएड (डिप्लोमा इन एज्युकेशन)नंतर डीटीएड (डिप्लोमा इन टीचर एज्युकेशन) आता डीएलएड(डिप्लोमा इन इलिमेंटी एज्युकेशन) या नावाने ओळखले जाते. दोन वर्षाच्या या अभ्यासक्रमाचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर आधी नोकरीची हमखास हमी होती. आधी दहावीच्या आणि नंतर बारावीच्या निकालानंतर डीएडच्या अभ्यासक्रमाला निवड होण्यासाठी फेरी पध्दत वापरली जायची. त्या फेरीतून निवड झालेल्या अध्यापक विद्यालयात प्रवेश निश्चित केला जात होता. मात्र मागील काही वर्षात विविध कारणांमुळे डीएडच्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र दिसून येते.
नोकरीची हमी नाही !
शिक्षक भरतीवरील मर्यादा, खासगी संस्थांच्या शाळांमधील डोनेशन पध्दती, सीईटी व टीईटीची वेळखाऊ परीक्षा पद्धती यामुळे विद्यार्थ्यांनी डीएड अभ्यासक्रम प्रवेशाकडे कानाडोळा केला आहे. शिवाय डीएड अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पूर्वीप्रमाणे नोकरीची हमीही उरलेली नाही. त्यामुळे एकेवेळी या प्रवेशासाठी स्पर्धा असलेल्या या अभ्यासक्रमासंदर्भात आता कोणीही या अन् प्रवेश घ्या अशी स्थिती झाली आहे.
---
जिल्ह्यातील डीएड कॉलेज - २४
एकूण जागा -१२५०
आलेले अर्ज - ७५०
---
म्हणून इतर अभ्यासक्रमांना घेता प्रवेश
तंत्रशिक्षण किंवा आयटीआय केल्यानंतर खासगी क्षेत्रात रोजगार अथवा स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. परंतु. डीएडनंतर टीईटी, सीटीईटी सारख्या वेगवेगळ्या परीक्षा देऊनही नोकरीची प्रतीक्षा करावी लागत असल्याने तंत्रशिक्षणाचा पर्याय निवडणेच योग्य ठरते.
-विराज शिंदे, विद्यार्थी
---
डीएड होऊनही विनाअनुदानित अथवा खासगी शाळांमध्ये वर्षानुवर्षे कोणत्याही मानधनाशिवाय अथवा अल्पवेतनावर काम करावे लागते, त्यापेक्षा तंत्रशिक्षणातून तत्काळ रोजगाराची संधी उपलब्ध होत असल्याने डीएडला विद्यार्थ्यांची नापसंती आहे.
अंकुश पवार, विद्यार्थी
---
प्राचार्य म्हणतात..
डी. एड. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पूर्वी थेट शिक्षकाची नोकरी मिळत होती. परंतु, आता डीएड उत्तीर्ण केल्यानंतरही टीईटी, सीईटी परीक्षा देऊन पात्रता सिद्ध करावी लागते. अशाप्रकारे पात्रता सिद्ध करूनही नोकरीची हमी उरलेली नाही, त्यामुळे डीएड अभ्यासक्रमाऐवजी पदवी प्राप्त करून स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढतो आहे.
-सुषमा पाटील, प्राचार्य, डीएड महाविद्यालय