नाशिक : गत काही वर्षात मोबाइल, इंटरनेट, सोशल मीडियांचे अबाल-वृद्धांचा जणू काही व्यसनच लागले आहे. बहुतांश जण तर काही मिनिटांसाठीसुद्धा मोबाइलचा विरह सहन करू शकत नाही. मोबाइलच्या या अतिवापरामुळे मानसिक संतुलन बिघडणे, चिडचिडेपणा वाढणे, रात्री झोप न येणे आदींसह विविध दुष्परिणामांचा सामना करावा लागत आहे. लहान मुले आणि तरुणाईत या समस्या वाढताना दिसत आहेत. रात्री झोपण्यापूर्वी मोबाइवर ऑडिओ-व्हिडीओ बघण्यात बऱ्याच वेळ जात असल्याने झोपेची वेळ टळून जाते व त्यामुळे अनेकांना निद्रानाशाची समस्या निर्माण होत आहे. याशिवाय मोबाइलचा अतिवापर मेंदू आणि कानाच्या ट्यूमरला कारणीभूत ठरण्याचा धोका संभवतो. त्यामुळे झोपण्यापूर्वी किमान अर्धा तास अगोदर मोबाइल दूर ठेवण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून केले जात आहे.
ठराविक वेळाने घ्या ब्रेक
बहुतांश नागरिकांना संगणक किंवा लॅपटॉपवर दैनंदिन काम करावे लागते. याशिवाय मोबाइलचा वापर आलाच. परिणामी स्क्रीन टाइममध्ये वाढ होऊन विविध समस्यांचा सामना करावा लागतो. हे टाळण्यासाठी काम करताना अर्धा ते एक तासाने किमान काही मिनिटांचा ब्रेक घेणे गरजेचे असते.
झोपेचे दोन-चार तास मोबाइलवर
झोपण्याआधी मोबाइल हाती घेतल्यास एखादा आवडीचा व्हिडीओ पाहिला की ती मालिका सुरूच राहते. मग त्यात दोन-तीन तास निघून जातात, ते कळतही नाही. त्यामुळे मध्यरात्रीपर्यंत अनेक जण जागेच असतात. एकदा झोपेची वेळ टळून गेल्यानंतर अवेळी चांगली झोप लागत नाही.
मोबाइलच्या अतिवापरामुळे अनेकांना त्याचे अक्षरश: व्यसन लागले आहे. त्यामुळे अनेकांना निद्रानाश, डोळे कमजोर होणे, डोकेदुखीसह चिडचिडेपणा वाढण्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. हे टाळण्यासाठी नियमित योग-प्राणायम करावेत. तसेच रात्री झोपण्यापूर्वी किमान अर्धा सात अगोदर मोबाइल बंद करून बाजूला ठेवायला हवा.
- डॉ. प्रमोद खैरणार, मानसोपचार तज्ज्ञ
उत्तम झोपेसाठी काय कराल?
रात्री उत्तम झोप येण्यासाठी दिवसा वामकुक्षी घेणे टाळा.
रात्री भरपूर खाणे टाळा.
धूम्रपान व मद्यपान टाळा, चहा/कॉफीचे सेवन टाळा.
झोपण्यापूर्वी व्यायाम टाळा, झोपेच्या गोळ्या घेऊ नका.
झोपण्यापूर्वी विचार टाळा, चुकीच्या स्थितीत झोपणे टाळा.