नाशिक : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत असताना जे नागरिक पुरेशी काळजी घेत आहेत, त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. केवळ सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून दक्षता घ्यावी.
या बिकट काळात आरोग्यदायी जीवनशैली हाच बचावाचा खरा मंत्र आहे. आरोग्याच्या दृष्टीने हितकर असणारी प्रत्येक गोष्ट करण्याला प्राधान्य देणे नितांत आवश्यक आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाला जीममध्ये जाणे शक्य नसले तरी घरीच किमान अर्धा ते एक तास व्यायाम करावा. केवळ घरात बनवलेल्या पदार्थांचे सेवन करण्यास प्राधान्य द्यावे. तसेच शीतपेये, थंड खाद्यपदार्थ पूर्णपणे वर्ज्य केल्यास शरीराला बाहेरून होऊ शकणाऱ्या धोक्याची शक्यता आपसूकच कमी होते. कोराेनाच्या या संकटाचा सामना सर्व आरोग्य यंत्रणा आणि नागरिकांना एकत्रितपणे करायचा असल्याचे भान प्रत्येकाने ठेवावे. तसेच या आजाराबाबत भीती बाळगू नये. घरात राहणाऱ्यांनी प्रसन्न मन ठेवावे. तसेच केवळ उदरनिर्वाहासाठी आवश्यक असणाऱ्यांनीच घराबाहेर पडावे. वडीलधारे आणि बालकांना सध्या घराबाहेर पाठवणे बंद करावे. आजारासारखी काही लक्षणे भासली तरी चाचणी करणे टाळू नका. त्यामुळे आजार बरा न होता, अजून वाढतो. तसेच त्यामुळे कुटुंबातील अन्य सदस्यदेखील बाधित होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे तत्काळ चाचणी आणि बाधित असल्याचे समजल्यावर तत्काळ उपचार हाच त्यावरील उपाय आहे. या परिस्थितीत कुणाला कोरोना झालाच तरी त्याला फोनव्दारे, व्हिडीओ कॉलद्वारे धीर द्यावा. या काळात मानसिक आरोग्य जपणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.
- डॉ. हेमंत सोननीस, अध्यक्ष, आयएमए
--------
फोटो
११डॉ. सोननीस