गेल्या वर्षी १८ सप्टेंबर रोजी अस्तित्वात आलेल्या मुख्यालयातील भीष्मराज बाम सभागृहातील पोलीस कोविड केअर सेंटर शहर पोलीस दलाला मोठा आधार देणारे ठरले होते. यावर्षी पुन्हा मागील काही दिवसापासून कोरोनाने डोके वर काढले असून, शहरात रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे, तसेच पोलीस आयुक्तालयातदेखील कोरोनाने शिरकाव केला आहे. सुमारे ४० पोलीस आतापर्यंत कोरोनाबाधित झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, पाण्डेय यांनी पोलीस कर्मचारी वर्गाकरिता पुन्हा या केंद्राची कवाडे खुली करण्याचा निर्णय घेत मनपाच्या वैद्यकीय पथकाच्या मदतीने केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे.
या केंद्रामध्ये पुरुषांकरिता ६० तर महिलांकरिता ४० खाटा राखीव असून, ६ ऑक्सिजन बेडसुद्धा उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शहर पोलिसांसह ग्रामीण पोलीस दल, महाराष्ट्र पोलीस अकादमी येथील अधिकारी, कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांना या केंद्रात कोरोनावरील उपचार घेता येणार असल्याची माहिती आयुक्तालयातील सूत्रांनी दिली आहे.